मराठवाडा : सोयगाव तालुक्यात अवैध वाळू व गौण खनिजाची सर्रास वाहतूक! महसूल,वनविभाग व पोलीस प्रशासन झोपेत!!
दिलीप शिंदे
सोयगाव : सोयगाव परिसराला लागून असलेल्या गलवाडा, वेताळवाडी, रायरी,धिंगापूर, निंबायती,रामपुरा,फरदापूर शिवार व बनोटी परिसराला लागून असलेल्या वाडी,पळाशी,घोरकुंड, गोंदेगाव, किन्हि भागासह तालुक्यातील नदी नाल्याच्या पात्रातून पात्र कोरून सर्रास अवैध वाळूचा उपसा व गौण खनिजाची सर्रास वाहतूक केली जात असून याबाबत मात्र महसूल प्रशासनाचं भरारी पथक कागदावरच असल्याने नोकरी शासनाची तर चाकरी वाळूमाफियांची तर करीत नाहीना असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडीत असून जिल्हाधिकाऱ्यांनी लक्षदेत शहरासह तालुक्यात होत असलेल्या अवैधरित्या वाळू व गौण खनिज वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय भरारी पथकाची स्थापना करावी अशी मागणी जोर धरीत आहे. नदीनालेच्या पात्रातून अज्ञात वाहनधारक डल्ला मारून नदीचे पात्र कोरून सर्रास उपसा करत आहे,यामध्ये महसूल विभागाचा शासनाचा कर बुडवून या वाळूची चोरी होत आहे. महसुलचे बहुतांशी अधिकारी, कर्मचारी,तलाठी हे अपडाऊन करीत असून रात्रीच्यावेळी विशेषतः शनिवार व रविवारी अवैधरित्या वाळू व गौण खनिजाची सर्रास वाहतूक केली जात असून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात येणारा ट्रॅक्टर व ट्रॉली क्रमांक नसल्याने पोलीसांच्या नजरेतून ट्रॅक्टर कसे काय सुटत आहे असा प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणाबाबत पोलिसांची हात मिळवणी असल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
महसूल भरारी पथक कागदावर
तहसिल कार्यालयाचे भरारी पथक हे कागदावरच असून अवैधरित्या वाळू व गौण खनिज वाहतूक करणारांवर मेहरबान असून कोणतीही कारवाई करीत नसल्याने अवैधरित्या वाळू व गौण खनिज वाहतूक करणारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून रात्री ट्रॅक्टर द्वारे सर्रास वाहतूक सुरू आहे. भरारी पथकातील भरारी पथकप्रमुखांसह, भरारी पथकातील कर्मचारी, तलाठी हे अपडाऊन करीत असून अवैधरित्या गौण खनिज वाहतूकीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडीत आहे. याकडे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देत कारवाई करण्या करिता उपाय योजना करावी व दोषी असलेल्या महसुलच्या संबंधितांची चौकशी करून कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
वनविभागाचे ’अर्थपूर्ण’ दुर्लक्ष
सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वनविभागाच्या हद्दीतून गौण खनिज वाहतुकीची कोणतीही परवानगी दिलेली नाही. मात्र वनपरिमंडळ अधिकारी बनोटी यांच्या आशीर्वादाने बनोटी परिसराला लागून असलेल्या नायगाव,वाडी,पळाशी,वरठाण, तिडका व नांदगाव येथील वनविभागाच्या हद्दीतून गौण खनिजाची सर्रास वाहतूक केली जात आहे. यामुळे वनसंपदेची तस्करी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र वनपरिमंडळ अधिकारी बनोटी यांच्या कडून अनेक वर्षांपासून एकदाही कारवाई झाली नसल्याने वनविभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: