पिंपरी : डांगे चौक येथे असलेली फ़ेडरल बँकेच्या शाखेची भिंत फ़ोडून आतील रक्कम लांबवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोर टोळीतील चार दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या सशस्त्र दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना प्रतिकार करत चारजणांना अटक करण्यात यश मिळविले. बाकीचे दरोडेखोर पळून जात असताना त्यांचा पाठलाग करताना एक पोलिस शिपाई पडून जखमी झाला. हा सर्व प्रकार ९ जुलै रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला.
काही जागरूक नागरिकांच्या सावधगिरी आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे दरोडेखोर गजाआड झाले आहेत. दरोडेखोरांनी रात्री बँकेची भिंत फ़ोडण्यास सुरुवात केल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांना याची चाहूल लागली. त्यांनी ताबडतोब याची सूचना पोलिसांना दिली.
त्यानंतर ५ मिनिटात थेरगाव आणि वाकड येथील गस्तीवरील पोलिसांनी तेथे धाव घेतली.पाहणी केली असता बँकेच्या शाखेची भिंत फ़ोडली असल्याचे त्यांना दिसून आले. पाहणी करत असताना आत अंधारात दडलेले ८ दरोडेखोर शस्त्रांसह पोलिसांच्या अंगावर चालून आले. पोलिसांनी त्यांना प्रतिकार करत चौघांना पकडले बाकीचे अंधाराचा फ़ायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले. या दरोडेखोरांचा पाठलाग करत असताना पोलिस शिपाई सोनवणे खाली पडले आणि जखमी झाले.
हाती लागलेल्या दरोडेखोरांकडून बँक फोडण्यासाठी लागणारे गॅसकटर, गॅस सिलेंडर, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी अवजारे, भिंत फोडण्यसाठी लागणारे गिरमीट असे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. पसार झालेल्या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली असून त्यांनी तपास सुरू केला आहे.
ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड, निरीक्षक (गुन्हे) रामचंद्र घाडगे , सहायक निरीक्षक संतोष पाटील, अनिल लोहार, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फ़ौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, हवालदार वंदु गिरे, संदीप गवारी, दिपक साबळे, स्वप्निल खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, नाईक प्रशांत गिलबीले, शिपाई अजय फल्ले, तात्या शिंदे, कौतेंय खराडे, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे, रमेश खेडकर, विनोद सोणवणे, नागनाथ कांबळे, खोडदे, घाडगे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: