पिंपरी : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे यांनी ५ मे रोजी सायंकाळी ट्विटरद्वारे शहरातील नागरिकांशी संवाद साधला.
नागरिकांनी ट्विटर द्वारे विविध प्रश्न उपस्थित केले काहींनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले तर काहींनी पोलीस व्यवस्था सुधारण्याची गरज असल्याचे ट्विट केले. शहरातील पोलिसिंगच्या बाबतीत काही बदल करणे गरजेचे असल्याचे प्रतीक कारंजे यांनी ट्विट केले.त्यावर आयुक्तांनी आपल्या तांत्रिकज्ञानाचा वापर शहरासाठी होईल, अशी आशा व्यक्त केली. शहरातील वाढत्या कोयता गॅंग आणि गुंडगिरी करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी विशाल दवणे यांनी केली. त्यावर पोलिसांनी आयुक्तांनी याबाबतचे थेट आकडे सादर करत सांगितले कि,मागील चार महिन्यात एकूण 59 शस्त्रे व 276 कोयते जप्त करण्यात आले आहेत. तसेच 135 कुख्यात गुंडांवर मोक्का व एमपीडीए अंतर्गत करवाई करण्यात आली आहे. भविष्यात अशीच कडक कारवाई चालू राहील.
एन के यांनी बुलेटचे फटाके फोडत जाणाऱ्यांवर कारवाई करा. विशेषतः जे रात्री 10 नंतर फोडतात. त्यांना तर चांगलाच प्रसाद द्या, असे ट्विट केले त्यावर आयुक्त म्हणाले, “कारवाई जोरात चालू आहे.या वर्षी 350 पेक्षा अधिक जणांवर कारवाई करुन सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत.”
संदीप भामरे यांनी बॅचलर शेजाऱ्यांचा त्रास होत असेल तर कायद्यात काही तरतूद आहे का, असे विचारले. त्यावर आयुक्तांनी केवळ 112 क्रमांकवर संपर्क करण्याची विनंती केली.निलेश बोराटे यांनी दोन पानांवर प्रश्न टाईप करून ते पोलीस आयुक्तांना ट्विट केले. त्यात संबंधित एकही प्रश्न नव्हता. ताऱ्यांची निर्मिती कशी होते. डोंगरावर उगवणाऱ्या गवताचे आयुष्य किती असते, अशा प्रकारचे प्रश्न होते. तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न नासा, एलन मस्क अथवा चॅट जीपीटीला विचारा असा सल्ला पोलीस आयुक्तांनी दिला. वाहतुकीचे प्रश्न सोडविण्यासाठी हिंजवडी वाहतूक विभाग पूर्णतः अपयशी ठरला असल्याची तक्रार राकेश यांनी केली. त्यावर हिंजवडी परिसरात अनेक संस्था संयुक्तपणे काम करत आहेत. त्यांच्या सोबत पोलीस देखील सर्वसमावेशकपणे काम करत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. योगेश जोशी यांनी हिंजवडी आयटी पार्क मध्ये पीक अवर्स मध्ये अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी वाहतूक विभागाला दिल्या आहेत. विदेशातील पोलिसांकडून कोणती गोष्ट शिकून ती शहरात लागू करण्यासारखी आहे, असा प्रश्न अमित आवारे यांनी उपस्थित केला. या प्रश्नाचे आयुक्तांनी कौतुक केले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी उत्तर देताना म्हटले कि, मी नेदरलँड येथील भारतीय दूतावासात काम करत असताना तिथे होणारा तंत्रज्ञानाचा वापर अतिशय प्रभावी वाटला. तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे पिंपरी चिंचवड शहरात करण्याचा मानस आहे.” प्रतीक नाईक यांनी प्रत्येक आठवड्याला नागरिकांशी संवाद साधण्याची विनंती केली. त्यावर आयुक्तांनी त्यांच्या ट्विटर आणि पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाशी या 95296 91966 व्हाटस अप क्रमांकावर संपर्क साधण्याची सूचना केली.
Reviewed by ANN news network
on
५/०६/२०२३ ०१:२९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: