पुणे : सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत ’मुसंडी’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण रविवारी माजी मंत्री राम शिंदे, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते पार पडले. पुण्यातील होटेल तरवडे क्लार्क इन येथे हा कार्यक्रम झाला.
यावेळी राम शिंदे (आमदार, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य), किशोर राजे निंबाळकर(MPSC बोर्ड चेअरमन, महाराष्ट्र राज्य), सुरज मांढरे (शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य), पांडुरंग वाठारकर (माजी कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य) आनंद माळी (वसंतराव नाईक महामंडळ, व्यवस्थापकीय संचालक), मेघराजराजे भोसले (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ) यांच्यासोबत रोहन पाटील, गायत्री जाधव, सुरज चव्हाण, घनश्याम दरवडे, शिवाजी दोलताडे, माणिक काळे ही कलाकार मंडळी उपस्थित होती.
स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होऊन प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक तरुण विद्यार्थी पाहतात. त्यातील जेमतेम १ टक्का विद्यार्थी यश मिळवू शकतात. बाकीच्या विद्यार्थ्यांचे काय होते?, ते कोणती वाट भविष्यात चोखाळतात? यावर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट असून यामध्ये रोहन पाटील, गायत्री जाधव, यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. या शिवाय, सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, अरबाज शेख, तानाजी गळगुंडे, अक्षय टाक, घनश्याम दरोडे छोटा पुढारी, सुरज चव्हाण गोलीगत हे भूमिका करणार आहेत.५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
यावेळी बोलताना लेखक निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले की, राज्यासह देशातील IAS, IPS आणि यशस्वी उदयोजक यांचे मार्गदर्शन घेऊन या चित्रपटाचे कथा रचना करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षांमधील अपयश व त्यातील आव्हाने याचा सामना कसा करावा? हे अनेकांना उमजत नाही. अशांसाठी हा चित्रपट यशाची गुरुकिल्ली ठरेल, असं मत एमपीएससी बोर्ड महाराष्ट्र राज्याचे चेअरमन किशोरराजे निंबाळकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले. आजच्या युवकांना दिशा देण्याचं काम 'मुसंडी' चित्रपट करेल असा विश्वास निर्माता व दिग्दर्शकांनी यावेळी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: