मानवाचा प्रवास कृत्रिम बुध्दीमत्तेबरोबरच अध्यात्मिक बुध्दीमत्तेकडे व्हावा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
पिंपरी : रोज वेगाने विकसित होणा-या तंत्रज्ञानामुळे मानवी बुध्दीमत्तेला आता कृत्रिम बुध्दीमत्तेची साथ मिळत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग भारतातील खेडोपाड्यात वेगाने आणि कमी खर्चात शिक्षण पोहचविण्यासाठी होणार आहे. मानवाचा प्रवास आता मानवी बुध्दीमत्तेकडून कृत्रिम बुध्दीमत्तेबरोबरच अध्यात्मिक बुध्दीमत्तेकडे व्हावा अशी अपेक्षा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘पढेगा भारत’ या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मचे जीओ टिव्ही चॅनलवर लॉचिंग शनिवारी पिंपरीत करण्यात आले. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रिलायन्स इनोव्हेशन कौन्सिलचे चेअरमन डॉ. रघुनाथ माशेलकर, भारत सरकार एनसीडीएनटीचे चेअरमन दादा इदाते, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरु डॉ. नितिन करमळकर, जीओचे दिपक शिवले, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे, पढेगा भारतच्या चेअरमन वेणू अमर साबळे, संचालक सम्यक साबळे, ओमकार कस्पटे आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, जीओच्या सहयोगाने ‘पढेगा भारत’ ची सुरुवात होणे हा आनंदाचा क्षण आहे. अणूस्फोटाचे तंत्रज्ञान विकसीत करुन वीस वर्षे पडून होते. परंतू तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ११ मे १९९८ रोजी आंतरराष्ट्रीय दबाव झुगारुन अणूस्फोट केला. डॉ. माशेलकर यांच्या नेतृत्वाखाली केलेला संकल्प तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सिध्दीस नेला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे एखादा संकल्प करुन प्रयत्नपूर्वक पुर्ण करतात. त्याचप्रमाणे वेणू साबळे यांनी सर्वदुर कमी खर्चात डिजीटल माध्यमातून शिक्षण पोहचविण्याचा केलेला पढेगा भारत जिओ टिव्ही हा संकल्प नक्कीच सिध्दीस जाईल.
यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, दहा कोटी शेतक-यांना एकाच वेळी एका क्लिकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाच्या तंत्रज्ञानामुळे अनुदान दिले. शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य पढेगा भारतच्या माध्यमातून होणार आहे.
रिलायन्स इनोव्हेशन कौन्सिलचे चेअरमन डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले की, पढेगा भारत जीओ टिव्ही हि संकल्पना खेड्यापाड्यातील, गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत कमी खर्चात वेगाने विस्तारणारा, मोठी व्याप्ती असणारा प्रकल्प आहे. ‘राईट टू एज्युकेशन’ नंतर आता ‘राईट एज्युकेशन’ महत्वाचे आहे. ज्ञान संवर्धनासह व्यक्ती म्हणजेच गुरु संवर्धनही आवश्यक आहे. या तंत्रज्ञानामुळे आत्मनिर्भर भारताबरोबर आता विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास येऊ लागला आहे.
भारत सरकार एनसीडीएनटीचे चेअरमन दादा इदाते म्हणाले की, भगवान गौतम बुध्द, महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा घेऊन ज्ञानदानाचा सुरु केलेला हा प्रकल्प नक्कीच यशस्वी होईल
प्रास्ताविक करताना पढेगा भारतच्या चेअरमन वेणू अमर साबळे म्हणाल्या की, टिव्ही, इंटरनेट हि मनोरंजनाची साधणे आता ज्ञानदानाचे काम करणार आहेत. देशातील ४५ कोटी घरात जीओ पोहचले आहे. वन नेशन, वन क्लॉलिटी एज्युकेशन सूत्रसंचालन प्रा. नाना शिवले यांनी केले. आभार माजी खासदार अमर साबळे यांनी मानले.
मानवाचा प्रवास कृत्रिम बुध्दीमत्तेबरोबरच अध्यात्मिक बुध्दीमत्तेकडे व्हावा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
Reviewed by ANN news network
on
१२/२५/२०२१ १०:३४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: