आळंदीला पाणी देण्याची जबाबदारी माझी : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : आळंदीतील नागरिकांना बंदिस्त नलिकांतून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची माझी जबाबदारी असून आठ दिवसात या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत असे आश्वासन पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले. पुणे महानगरपालिकेने भामा आसखेड धरणातून आणलेले पाणी आळंदीला कुरुळी येथे टॅपिंग करून मिळणार आहे. यासाठी आळंदी नगरपरिषदेने कुरुळी ते आळंदी पाणी आणण्यासाठी जलवाहिन्यांचे काम पूर्ण केले आहे. केवळ टॅपिंगचे काम व करारनामा प्रलंबित राहिला आहे. या संदर्भात आळंदी नगरपरिषद व पुणे महापालिका यांच्यातील करारनामा व पुढील कामास गती देण्यासाठी महापौर मोहोळ यांच्या कक्षात आळंदी नगरपरिषद व पुणे महानगरपालिकेचे संबंधित कार्यकारी अभियंता, अधिकारी, कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मोहोळ बोलत होते. या बैठकीस आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे डी. व्ही. जगधने, आळंदी पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अक्षयकुमार शिरगिरे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, भाजप सरचिटणीस पांडुरंगशेठ ठाकुर,अर्जुन मेदनकर, पुणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी कुरुळी पंपिंग स्टेशन ते आळंदी अशी पिण्याची बंधीस्त जलनलिका टाकण्याचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले. केवळ करारनामा व टॅपिंग चे काम पुणे महापालिकेच्या परवानगी अभावी राहिले असून करारनाम्यातील अटी, शर्ती शिथिल करून आळंदीला तात्काळ पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी आळंदी पालिका प्रशासनाने केली आहे. यावेळी पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेचे अधिकारी यांचेशी संवाद साधून या कामा बाबत माहिती जाणून घेतली. यावेळी मोहोळ म्हणाले, या संदर्भात जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ यांचेशी संवाद साधून पुढील कामकाज येत्या आठ दिवसांत पूर्ण करून आळंदीला पाणी देण्याची माझी जबाबदारी आहे. भामा आसखेड धरणातून पुणे महानगरपालिकेला जाणा-या जलवाहिनीतून कुरूळीतील जॅकवेलमधून टॅपिंगद्वारे आळंदी पाणी पुरवठा करण्यास पाइप लाइन चे काम पूर्ण झाले आहे. यासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतुन राज्य शासनाने साडेपाच कोटी रूपयांचा निधी दिला आहे.
आळंदीला पाणी देण्याची जबाबदारी माझी : महापौर मुरलीधर मोहोळ आळंदीला पाणी देण्याची जबाबदारी माझी : महापौर मुरलीधर मोहोळ   Reviewed by ANN news network on १२/२५/२०२१ १०:३०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".