पिंपरी-चिंचवड: बौद्ध महिलांचा ऐतिहासिक प्रवास, वर्तमानातील स्थान आणि भविष्यातील वाटचाल यावर सखोल विचारमंथन करण्यासाठी भारतासह श्रीलंका, व्हिएतनाम, कोरिया आणि ऑस्ट्रेलिया येथील बौद्ध भिक्खुणी, विचारवंत, संशोधक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत. ‘विस्डम इन मोशन फोरम’ आणि ‘कॅटॅलिस्ट फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद पुणे २०२६’ ही महत्त्वपूर्ण परिषद शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
‘बौद्ध महिलांचा प्रवास : प्रज्ञा, नेतृत्व आणि सामाजिक परिवर्तन’ ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. भगवान बुद्धांच्या भिक्खुणी संघाच्या परंपरेपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांनी बौद्ध समाजात घडवलेल्या बदलांपर्यंतचा आढावा या परिषदेत घेतला जाणार आहे. तसेच महिलांच्या सद्यस्थितीतील प्रश्न आणि पुढील वाटचालीसाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा होणार असल्याची माहिती आयोजन समितीच्या अध्यक्षा तथा भूलरोगतज्ज्ञ उज्ज्वला आंदुरकर, बालरोगतज्ज्ञ संध्या हरिभक्त, वैद्यकीय नोडल अधिकारी वैशाली भामरे आणि पाली व बौद्ध अध्ययनाच्या अभ्यासक लक्ष्मीकांता माने यांनी दिली.
परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि दलित स्त्रीवादी अभ्यासक प्रा. डॉ. विमल थोरात यांच्या हस्ते पार पडणार आहे. मिलिंद महाविद्यालयाच्या प्रथम महिला प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान आणि कामगार सहआयुक्त शिरीन संजू लोखंडे हे या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
परदेशी भिक्खुणी व अभ्यासकांचा सहभाग
या परिषदेमध्ये विविध सत्रांमध्ये देश-विदेशातील तज्ज्ञ वक्ते आपले विचार मांडणार आहेत. यामध्ये श्रीलंकेतील कोलंबो विद्यापीठाच्या विभागप्रमुख प्रा. मनोरी पी. सेनानायके, मुंबई विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. योजना भगत, ऑस्ट्रेलियातील नवयान बौद्ध चॅरिटेबल ऑर्गनायझेशनच्या संचालिका व शिक्षणतज्ज्ञ डॉ. रुपाली मुन, व्हिएतनामच्या भिक्खुणी व संशोधक भिक्खुणी विसुद्धिपञ्ञा, पुण्यातील मानसशास्त्रज्ञ व विपश्यना शिक्षिका डॉ. नीलम ओसवाल आणि कोरियातील भिक्खुणी व संशोधक भिक्खुणी महाकासा यांचा समावेश आहे. दैनंदिन जीवनातील बौद्ध मूल्ये, शिलालेखांतून उलगडणारा धम्म, परदेशातील आंबेडकरी विचारांची भूमिका आणि मानसिक ताण-तणावांवर धम्माच्या माध्यमातून मात यांसारख्या विविध विषयांवर हे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
सत्रांचे नियोजन आणि वैविध्यपूर्ण चर्चा
परिषदेदरम्यान तीन महत्त्वाची सत्रे पार पडणार आहेत:
पहिले सत्र: ‘बाबासाहेबांना अभिप्रेत समाजाभिमुख बौद्ध धम्म’ या विषयावर चर्चा होणार असून डॉ. दीप्ती किरतकर या सत्राचे सूत्रसंचालन करतील. यात अभिनेत्री चिन्मयी सुमीत, शल्यचिकित्सक डॉ. शिल्पा चौधरी (पाझारे) आणि रविवार धम्मशाळेच्या संस्थापक शिवांजली गायकवाड सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, डॉ. शिल्पा चौधरी या १९४२ मधील ऐतिहासिक महिला परिषदेत कार्यरत असलेल्या जाईबाई चौधरी यांच्या पणती आहेत.
दुसरे सत्र: ‘२१ व्या शतकातील भिक्खुणी संघ : आव्हाने, पुनरुज्जीवन आणि पुढील वाटचाल’ या विषयावर होणाऱ्या या सत्राचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांता माने करणार आहेत. यात श्रीलंकेतील भिक्खुणी उप्पलवण्णा थेरी, तिबेटी बौद्ध भिक्खुणी व माजी अभिनेत्री द्रुपोन ग्याल्तेन साम्तेन (बरखा मदान), अखिल भारतीय भिक्खुणी संघाच्या सचिव भंते सुनीती भिक्खुणी आणि बोधिपक्खिय धम्म फाउंडेशनच्या संस्थापक भिक्खुणी साक्य धम्मदिन्ना सहभागी होणार आहेत.
तिसरे सत्र: ‘जयभीम २.० : तरुणाईतील वाढता जयभीम क्रेझ’ या विषयावर होणाऱ्या या सत्राचे सूत्रसंचालन ॲड. कोमल शिंदे करणार आहेत. यात लेखिका मीनाक्षी इंगळे, विद्यार्थी चळवळीत सक्रिय असलेल्या डॉ. सांची कांबळे आणि पत्रकार छाया काविरे सहभाग घेणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४२ मध्ये नागपूर येथे आयोजित केलेल्या ‘ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वुमेन्स कॉन्फरन्स’ या ऐतिहासिक महिला परिषदेच्या वारशातून या उपक्रमाला प्रेरणा मिळाली आहे. बुद्धांच्या समतेच्या शिकवणीला आंबेडकरी चळवळीतील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांशी जोडत बौद्ध महिलांच्या प्रगतीसाठी आवश्यक दिशा निश्चित करणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
Labels: Pimpri Chinchwad News, International Buddhist Women Conference 2026, Dr Babasaheb Ambedkar, Ramkrishna More Auditorium, Women Leadership, Dhamma
Search Description: International Buddhist Women Conference 2026 will be held on October 17 at Ramkrishna More Auditorium, Chinchwad, featuring global scholars, bhikkhunis, and thinkers.
Hashtags: #PimpriChinchwad #BuddhistWomenConference #DrBabasahebAmbedkar #Chinchwad #WomenLeadership #MaharashtraNews
Reviewed by ANN news network
on
१०/१४/२०२६ ०१:४५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: