पुणे: पुण्यातील भवानी पेठ परिसरातील काशेवाडी येथे २ ऑक्टोबर रोजी घडलेल्या एका सराईत गुन्हेगाराच्या निर्घृण खून प्रकरणाचा खडक पोलिसांनी अवघ्या तीन तासांत उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मयताच्या निकटवर्ती मित्रालाच अटक केली आहे. जुन्या वादातून किंवा ऐनवेळी झालेल्या भांडणातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस पुढील सखोल तपास करत आहेत.
अक्षय उर्फ झुरळ्या पाटोळे असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास काशेवाडीतील श्री मुरतजी को-ऑपरेटिव्ह सोसायटीजवळील वजन काटा परिसरात अक्षय याचा अज्ञात इसमाने डोक्यात व तोंडावर जबर वार करून अत्यंत निर्घृणपणे खून केला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उप आयुक्त (परिमंडळ १), सहाय्यक पोलीस आयुक्त (फरासखाना विभाग) आणि खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश तपास पथकाला देण्यात आले.
खडक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, पोलीस उप निरीक्षक महेंद्र कांबळे, राहुल मखरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसराची नाकाबंदी करून माहिती घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान पोलीस अंमलदार निलेश साबळे व अमित जमदाडे यांना बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. मयत अक्षय उर्फ झुरळ्या हा घटनेच्या सायंकाळपर्यंत त्याचा मित्र अजय उर्फ चोर राजा सुखदेव शिंदे (वय ३१, रा. महादेव मंदिराजवळ, काशेवाडी, पुणे) आणि इतर दोन मित्रांसोबत परिसरात एकत्र फिरत होता.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित साथीदारांचा शोध सुरू केला असता अजय उर्फ चोर राजा हा काशेवाडीतून फरार झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी लागलीच त्याच्या घरी, नातेवाईकांकडे आणि मित्रांच्या ठिकाणी छापे मारले. पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच आणि चोहोबाजूने फास आवळला गेल्याचे पाहून संशयित आरोपी अजय उर्फ चोर राजा हा स्वतः खडक पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने आपला मित्र अक्षय उर्फ झुरळ्या याला मारल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.
हा संपूर्ण तपास अपर आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, उप आयुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक धनंजय पिंगळे, निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार आणि समाधान पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. तपासात सहाय्यक निरीक्षक प्रसन्न जराड, राकेश जाधव, अमोल वळसंग, अस्मिता लाड, उप निरीक्षक महेंद्र कांबळे, राहुल मखरे, स्वप्नील बनकर, प्रदिप खाडे, सहाय्यक उप निरीक्षक संतोष मोहिते, विनोद शिंदे व पथकाने महत्त्वाची कामगिरी बजावली. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक राकेश जाधव करत आहेत.
Labels: Pune Crime, Murder Case, Khadak Police, Kashewadi Pune, Crime Arrest, Pune Police
Search Description: Khadak police detect a murder case of criminal Akshay Patole in Kashewadi Pune within 3 hours and arrest his friend Ajay alias Chor Raja Shinde.
Hashtags: #PuneCrime #MurderInvestigation #KhadakPolice #PunePolice #BreakingNews #CrimeUpdate
सराईत गुन्हेगाराच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा अवघ्या तीन तासांत उलगडा
Reviewed by ANN news network
on
१०/०६/२०२६ ०४:०४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: