पुणे: पुणे शहरातील नांदेडसिटी वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या खडकवासला चौक ते खडकवासला चौपाटी क्रमांक ०२ यादरम्यान होणारी तीव्र वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने मोठा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील २.५ ते ३ किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दोन्ही बाजू नो-पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील तात्पुरते आदेश २ सप्टेंबर २०२६ रोजी वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ आणि ११७ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून निर्गमित केले आहेत.
खडकवासला चौपाटी परिसर हा पर्यटनाचे प्रमुख केंद्र असल्याने येथे दररोज, विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी, पर्यटकांची मोठी गर्दी होते. पर्यटक चौपाटीलगत रस्त्यावरच अस्ताव्यस्त वाहने पार्क करत असल्याने आणि सदर रस्ता अत्यंत अरुंद असल्याने रहदारीस प्रचंड अडथळा निर्माण होऊन नियमित वाहतूक कोंडी होत होती.
या आदेशाबाबत नागरिकांना काही सूचना अथवा हरकती नोंदवायच्या असल्यास त्यांनी २ सप्टेंबर २०२६ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस शेजारी, बंगला क्र. ०६, पुणे या कार्यालयात लेखी स्वरूपात सादर कराव्यात. प्राप्त हरकतींचा विचार करून, अत्यावश्यक सेवेतील वाहने (अग्निशामक दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका) वगळून अंतिम आदेश काढण्यात येतील. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Labels: Khadakwasla Chowpati, Pune Traffic Police, No Parking Zone, Traffic Management Pune, Dr Sandeep Bhajibhakare
Search Description: Pune Traffic Police declared 2.5 to 3 km stretch from Khadakwasla Chowk to Chowpati No. 2 as No-Parking zone to curb traffic jams.
Hashtags: #PuneTraffic #Khadakwasla #NoParking #PunePolice #TrafficRules #KhadakwaslaDam
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा