शिंदे-फडणवीस सरकार कायद्यापेक्षा मोठे नाही!" : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा घणाघाती प्रहार!





नागपूर / मुंबई: मराठवाड्यात जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर दबावतंत्राखाली वाटण्यात आलेली कुणबी जात प्रमाणपत्रे आता बेकायदेशीर ठरून रद्द होण्यास सुरुवात झाली आहे. यातील चार जणांची प्रमाणपत्रे तपासणीत अवैध ठरली असून, शेकडो बनावट प्रमाणपत्रे रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व प्रकारामुळे निवडणुका जिंकलेले लोकप्रतिनिधी अपात्र ठरतील आणि नागपूर जिल्हा परिषदेप्रमाणे मराठवाड्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांवरील निवडणुका रद्द होऊन सरकारचा आणि जनतेचा निधी वाया जाईल, असा घणाघाती आरोप विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
 
"संविधानापेक्षा आणि कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही"
पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण आणि ओबीसी हक्कांवर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, "ओबीसी आरक्षण हे घटनात्मक संरक्षण असून संविधानाने दिलेल्या ५०-५२ टक्के लोकसंख्येच्या आधारावर २७ टक्के देण्यात आलेले आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या समाजासाठी लढत आहेत, त्याला आमचा आक्षेप नाही. मात्र, १९५० पूर्वीचे वैध पुरावे नसताना आणि कौटुंबिक इतिहास जुळत नसताना केवळ राजकीय दबावापोटी दिलेली 'सरसकट' प्रमाणपत्रे ही जात पडताळणी समितीच्या (Validity) निकषात बसत नाहीत. राज्य सरकारने कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावेत. कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा कोणताही व्यक्ती अथवा सरकार मोठे नाही. फडणवीस सरकारने कायद्याचे पालन करूनच पुढील कार्यवाही करावी," अशी मागणी त्यांनी केली.

"जिथे अदानी बोट ठेवतील, तो प्रकल्प त्यांच्या घशात!"
पुण्यातील जुन्नर तालुक्यातील नाणेघाट परिसरातील अंजनावळे-घाटघर भागात १५०० मेगावॅटचा 

स्टोरेज प्रकल्प वीज प्रकल्प अदानी समूहाला देण्याच्या निर्णयावर वडेट्टीवार यांनी महायुती सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. "अदानी बोले, मोदीजी चाले आणि महाराष्ट्र सरकार मागे मागे धावे, अशी स्थिती सध्या देशात आहे. मुरबाड आणि जुन्नर तालुक्यातील ८९ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने आणि ५ हजार पोलीस लावून लाटण्याचा घाट घातला जात आहे. अदानी भारताची जमीन आणि पाणी वापरून तयार झालेली वीज पाकिस्तान व बांगलादेशला विकत आहेत आणि आपल्याच राज्यातील वीज संच बंद ठेवून महागड्या दराने अदानीकडून वीज खरेदी केली जात आहे. महाराष्ट्रातील तब्बल ७ ते ८ लाख कोटींच्या जमिनी कवडीमोल दराने अदानींच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे. काँग्रेस शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि या प्रकल्पाला पूर्ण ताकदीने विरोध करेल," असा इशारा त्यांनी दिला.


राज्यावर साडेसात लाख कोटींचे कर्ज; कंत्राटदारांचे ६१ हजार कोटी थकीत
राज्याच्या आर्थिक स्थितीवर वडेट्टीवार यांनी आकडेवारीसह गंभीर ताशेरे ओढले. "सध्या महाराष्ट्र राज्य साडेसात लाख कोटी रुपयांच्या प्रचंड कर्जात बुडाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) ५८ हजार कोटी रुपये आणि आदिवासी विकास विभागाचे कंत्राटदारांचे ३ हजार कोटी रुपये असे एकूण ६१ हजार कोटी रुपयांहून अधिक देणी थकीत आहेत. आदिवासी आश्रमशाळांच्या पुरवठादारांचे ६ कोटी रुपये न दिल्याने ९८० आश्रमशाळांतील गरीब आदिवासी मुलांना आज अन्न मिळेनासे झाले आहे. हे सरकार स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी मग नेहरू, इंदिरा गांधी किंवा आखाती देशांवर दोष ढकलून मोकळे होते," असा टोला त्यांनी लगावला.
 
'गुंगी गुडीया' वक्तव्यावरून राष्ट्रवादीवर पलटवार अन् सुनेत्रा पवारांना सल्ला
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत वापरलेल्या 'गुंगी गुडीया' या शब्दावरून राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) सुरू केलेल्या आंदोलनाचा वडेट्टीवार यांनी समाचार घेतला. "गुंगी गुडीया हा शब्द कोणतीही शिवी किंवा अपमान नाही. इतिहास साक्षी आहे की, डॉ. राममनोहर लोहिया यांनी स्व. इंदिरा गांधी यांच्यासाठी हा शब्द वापरला होता. परंतु, त्याच इंदिरा गांधी पुढे देशाच्या व जगाच्या 'आयरन लेडी' म्हणून नावारूपाला आल्या. स्व. अजितदादांच्या दुर्दैवी विमानांच्या अपघाताची साधी एफआयआर (FIR) दाखल करण्याची हिंमत ज्या नेत्यांमध्ये नाही, ते सत्तेचे भुकेले आज आंदोलनाचे नाटक करत आहेत. सुनेत्रा वहिनींनी या टीकेला उत्तर देत आपल्या कर्तृत्वाच्या आणि ताकदीच्या जोरावर ठामपणे उभे राहावे, हाच आमचा उद्देश होता," असे त्यांनी स्पष्ट केले.
 
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या युवा संवादावर टीका
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या मुंबईतील तरुणांशी संवादावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, "देशातील तरुणांच्या हातातील रोजगार हिरावला गेला आहे. शिक्षण व्यवस्थेची पुरती वाट लागली आहे आणि दररोज पेपर फुटत आहेत. या बेरोजगारीवर आणि भविष्यावर बोलण्याऐवजी भाजप नेत्यांच्या मुलांना बोलावून शाखेत येण्याचे आणि बनावट देशभक्तीचे धडे दिले जात आहेत. ज्यांचे पूर्वज इंग्रजांसोबत होते आणि स्वातंत्र्याला विरोध करत होते, त्यांनी देशप्रेमाचे धडे देऊ नयेत. देशातील तरुण आता या सरकारच्या विरोधात उभा ठाकला आहे," असे प्रतिपादन त्यांनी केले.

शेवटी, जात जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात ओबीसींचा स्वतंत्र कॉलम न ठेवल्याने केंद्र सरकारने ओबीसींची फसवणूक केली असून, दुसऱ्या टप्प्यात हा कॉलम समाविष्ट करण्यासाठी काँग्रेस ताकदीने जनयात्रा काढून केंद्र सरकारला जाब विचारेल, असा पुनर्उच्चार त्यांनी केला.


  • Labels: Vijay Wadettiwar, Kunbi Certificate, OBC Reservation, Adani Power Project, Manoj Jarange Patil, Maharashtra Politics, Congress Press Conference

  • Search Description: Senior Congress leader Vijay Wadettiwar addresses a live press conference in Nagpur targeting Maharashtra Govt over invalid Kunbi certificates, Adani power projects, and state debt.

Hash Tags

#VijayWadettiwar #MaharashtraPolitics #KunbiCertificate #OBCReservation #AdaniGroup #ManojJarangePatil #CongressNews #BreakingNews #NagpurNews


शिंदे-फडणवीस सरकार कायद्यापेक्षा मोठे नाही!" : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा घणाघाती प्रहार! शिंदे-फडणवीस सरकार कायद्यापेक्षा मोठे नाही!" : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा घणाघाती प्रहार! Reviewed by ANN news network on ८/०६/२०२६ ११:२४:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".