मुंबई, दिनांक २२ ऑगस्ट २०२६: न्यायालयाला व पोलिसांना सलग ३६ वर्षे चकवा देऊन नाव व पत्ता बदलून राहणाऱ्या ओमप्रकाश लालता पासी (वय ५५, रा. पूनम रेसिडेन्सी, मिरा रोड पूर्व, ठाणे) या फरार आरोपीला बोरीवली पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रतिबंधक पथकाने शिताफीने अटक केली आहे. १९९० मधील हत्येच्या प्रयत्नाच्या (कलम ३०७) गुन्ह्यात आरोपीला न्यायालयाने फरार घोषित केले होते.
बोरीवली पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक ७२/१९९० (भारतीय दंड संहिता कलम ३०७, ३४) मधील आरोपी ओमप्रकाश पासी (मूळ रा. हनुमान नगर, कांदिवली पूर्व) हा खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात वारंवार गैरहजर राहत होता. त्यामुळे न्यायालयाने त्याला स्थायी फरार घोषित केले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सतत आपले राहण्याचे ठिकाण व संपर्क क्रमांक बदलत होता, त्यामुळे गेली ३६ वर्षे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
बोरीवली पोलीस ठाण्याच्या पथकाने पारंपरिक तपासासोबतच आधुनिक तांत्रिक तपासाची जोड दिली. आरोपीच्या जुन्या माहितीचे आणि तांत्रिक विश्लेषणाचे बारकाईने काम करून त्याच्या संभाव्य वास्तव्याची माहिती मिळवली. आरोपी मिरा रोड पूर्व येथील पूनम रेसिडेन्सी येथे राहत असल्याचे निश्चित झाल्यावर पोलीस उपनिरीक्षक अतुल लांडगे व पथकाने तेथे जाऊन छापा टाकला आणि ओमप्रकाश पासी याला ताब्यात घेऊन अटक केली.
ही कामगिरी पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २) संदीप घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष धनवटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुष्पलता मंडले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिग्विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अतुल लांडगे, सहाय्यक फौजदार भालचंद्र थोरात, हवालदार सुशांत तांबे, शिपाई कैलास उगले व कदम यांच्या पथकाने केली आहे.
Labels: Borivali Police, Crime News Mumbai, Absconding Arrest, Mira Road, Attempt to Murder Case
Search Description: Borivali Police arrested 55-year-old Omprakash Pasi from Mira Road, who was absconding for 36 years in a 1990 attempt to murder case.
Hashtags: #BorivaliPolice #MumbaiPolice #MiraRoad #AbscondedAccused #CrimeNews
३६ वर्षांपासून चकवा देणारा फरार आरोपी अखेर जाळ्यात
Reviewed by ANN news network
on
८/२३/२०२६ ०३:४८:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: