नजर काढण्याच्या बहाण्याने घरात घुसून तृतीयापंथीयाच्या वेषातील तरुणाने केला महिलेवर अत्याचार, चार तासात अटक
मुंबई : पवई परिसरात नजर काढण्याच्या बहाण्याने घरात घुसून एका महिलेशी अश्लील कृत्य करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका तरुणाला पवई पोलिसांनी केवळ ४ तासांच्या आत अटक केली आहे. अनिल शेषराव शिंदे (वय २८, रा. गोलाई नगर, खारेगाव, कळवा, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो तृतीयापंथीयाचा बनाव करून भीक मागत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
१८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२:२० वाजेच्या सुमारास तक्रारदार महिला त्यांच्या राहत्या घरी एकट्या असताना 'अनिल' नावाचा तृतीयपंथी असल्याचा बनाव करणारा तरुण त्यांच्या दारात आला. त्याने महिलेची 'नजर काढतो' असे सांगून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममध्ये जाऊन महिलेशी जवळीक साधत, तिचे किंवा तिच्या कुटुंबाचे बरे-वाईट करण्याची भीती दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरून पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ८९०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ७४(१), ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणावरून साडी परिधान केलेला संशयित इसम एका रिक्षातून पळून गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी मानवी कौशल्य आणि तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता आरोपी ठाण्यातील कळवा येथील झोपडपट्टीत राहत असल्याचे निष्पन्न झाले. पवई पोलिसांच्या पथकाने कळव्यातील गोलाई नगर येथे छापा टाकून अवघ्या ४ तासांत आरोपी अनिल शिंदे याला ताब्यात घेतले. तपासात आरोपी तृतीयापंथी नसून साडी नेसून भिक्षा मागणारा बहुरूपी असल्याचे समोर आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दादासाहेब घुटुकडे आणि पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुशांत बडगर, उपनिरीक्षक संदीप पाटील, महिला उपनिरीक्षक देशमुख, उपनिरीक्षक पिंजरकर तसेच हवालदार टिळेकर, झेंडे, नलावडे आणि शिपाई शेट्टी व शिंदे यांनी केली आहे.
Labels: Powai Police, Assault Case Arrest, Crime News Mumbai, Kalwa Thane, Fake Transgender Arrested
Search Description: Powai Police arrested a 28-year-old fake transgender impersonator Anil Shinde within 4 hours for sexually assaulting a woman under pretext of removing evil eye.
Hashtags: #PowaiPolice #MumbaiPolice #CrimeNews #SafetyAlert #ThaneNews
नजर काढण्याच्या बहाण्याने घरात घुसून तृतीयापंथीयाच्या वेषातील तरुणाने केला महिलेवर अत्याचार, चार तासात अटक
Reviewed by ANN news network
on
८/२३/२०२६ ०४:२१:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: