सोसायटीधारकांची आर्थिक लूट आणि ३० टक्के पाणी गळती रोखण्यात प्रशासन अपयशी; खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिकेची घेतली झाडाझडती
पिंपरी, दि. २३ जून २०२६ (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड शहरात चार दिवसांपासून लागू करण्यात आलेली पाणी कपात आणि विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये वाढलेल्या तीव्र असंतोषाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी काल, सोमवारी महापालिका अधिकाऱ्यांसोबत एक तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत बारणे यांनी शहरात टँकरद्वारे होणाऱ्या अशुद्ध पाणीपुरवठ्याची गंभीर दखल घेत, अशुद्ध पाणी देणाऱ्या आणि सोसायट्यांची आर्थिक लूट करणाऱ्या टँकर चालकांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. शहरात ३० टक्के पाणी गळती होत असताना आणि अनधिकृत नळजोडण्या रोखण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळेच ही पाणी टंचाई निर्माण झाल्याचा गंभीर आरोप करत बारणे यांनी महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर तीव्र ताशेरे ओढले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, ऐश्वर्या तरस, निलेश तरस, राजेंद्र तरस, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता महेश बरिदे, विजयसिंह भोसले, सुनील अहिरे आणि कनिष्ठ अभियंता अनिश ओक उपस्थित होते. बैठकीत बारणे यांनी स्पष्ट केले की, टँकर चालक पाणी नेमके कोठून भरतात आणि ते पिण्यायोग्य आहे का, याची तांत्रिक तपासणी आरोग्य विभागाने करणे गरजेचे आहे. जादा पैसे घेऊन सोसायट्यांना वेठीस धरणाऱ्या टँकर चालकांवर तात्काळ कायदेशीर निर्बंध आणून त्यांची कडक नोंदणी ठेवावी. तसेच, इतर विकासकामांमध्ये काटकसर करून पाणीपुरवठ्याचे प्रलंबित प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावेत, यासाठी आपण स्वतः मनपा आयुक्त आणि महापौरांशी थेट चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आढावा बैठकीत किवळे परिसरातील एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. किवळे येथील कैवल्य सोसायटी आणि सेंटीयोगा या दोन सोसायट्यांच्या बांधकाम धारकांनी मनपाच्या बांधकाम परवानगी विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून, पवना बंदिस्त जलवाहिनीचे कोट्यवधी रुपये खर्च करून टाकलेले मुख्य पाईप बेकायदेशीरपणे काढून टाकले आहेत. यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे तांत्रिक नुकसान झाले असून, या गैरव्यवहारात सामील असलेल्या सर्व दोषी अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कडक सूचना बारणे यांनी अतिरिक्त आयुक्तांना केली. याशिवाय, शहरात उभारण्यात आलेल्या समान पाणीपुरवठा आणि 'स्काडा' (SCADA) प्रणालीच्या अपयशावरही त्यांनी बोट ठेवले.
बैठकीत शहरातील गृहप्रकल्पांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा (STP) आढावा घेण्यात आला. शहरातील ४९४ सोसायट्यांपैकी ३६९ सोसायट्यांमधील एसटीपी प्रकल्प सुरू असून १२५ सोसायट्यांचे प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. हे बंद प्रकल्प तातडीने सुरू करून त्यावर कडक निगराणी ठेवण्याचे आदेश देण्यात आले. जुन्या सोसायट्यांना तांत्रिक कारणांमुळे स्वतःचे प्रकल्प उभारणे शक्य नसल्यास तिथे महापालिकेने लहान एसटीपी (ACTP) उभारण्याचा प्रयत्न करावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना मांडण्यात आली. शेवटच्या टप्प्यात बारणे यांनी सांगितले की, गेल्या आठ वर्षांत लोकसहभागातून पवना धरणातील १ लाख क्युबिक मीटर गाळ काढल्यामुळे १ टीएमसी पाणीसाठा वाढला असून दीड महिना पुरेल एवढे अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे; अन्यथा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शहराला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले असते. मुळशी धरणातून अतिरिक्त ७ टीएमसी पाणी शहरासाठी आणण्यासाठी राज्य शासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
Labels:
PCMC Water Crisis,Shrirang Barne Review Meeting,Pimpri Chinchwad Water Tanker Action,Pavna Pipeline Scam Kiwale,STP Plants PCMCSearch Description: MP Shrirang Barne ordered PCMC to take strict legal action against illegal water tankers supplying impure water and investigated the multi-crore Pavna pipeline damage in Kiwale.
Hashtags: #PCMCWaterCrisis #ShrirangBarne #PimpriNews #WaterTankerAction #PavnaPipeline #AstraNewsNetwork
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: