चित्रपटामुळे शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचा दावा
पुणे, (प्रतिनिधी): आगामी 'खालिद का शिवाजी' या मराठी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिकदृष्ट्या खोटी आणि विकृत माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत 'हिंदु राष्ट्र समन्वय समिती'ने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी बुधवारी (७ ऑगस्ट) पुणे शहरातील झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ, बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात समितीने म्हटले आहे की, चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५% मुस्लिम सैनिक होते, ११ अंगरक्षक मुस्लिम होते आणि रायगडावर मशिद बांधली होती, असे आक्षेपार्ह दावे करण्यात आले आहेत. हे सर्व दावे कोणत्याही ऐतिहासिक पुराव्यांशिवाय प्रसारित करण्यात आले असून, यामुळे समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
यावेळी समितीने, शिवाजी महाराजांना 'सेक्युलर' ठरवण्याचा हा हेतुपुरस्सर प्रयत्न इतिहासाच्या नावाने समाजात गोंधळ निर्माण करणारा आहे, असे मत मांडले. तसेच, हा चित्रपट नवीन पिढ्यांमध्ये इतिहासाबद्दल गैरसमज निर्माण करेल आणि शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांचा विश्वासघात करणारा आहे, असेही म्हटले.
या आंदोलनात लेखक आणि इतिहास अभ्यासक सौरभ कर्डे, भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस उज्ज्वला गौड, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे मुकुंद मासाळ, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. महेंद्र महाराज म्हस्के यांच्यासह अनेक मान्यवर आणि बहुसंख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
अधिवक्ता निलेश निढाळकर यांनी, "छत्रपती शिवाजी महाराज हिंदू राजे होते आणि त्यांचे विकृतीकरण हे धर्मभ्रष्ट करण्याचे षडयंत्र आहे," असे सांगितले. तसेच, श्री शिव शंभु विचार मंचचे राज्य संयोजक सुधीर थोरात यांनी, "हा चित्रपट केवळ एका संघटनेचा नव्हे, तर पूर्ण हिंदू समाजाचा अपमान आहे," असे म्हटले. 'हिंदु राष्ट्र समन्वय समिती'ने या चित्रपटातील ऐतिहासिक माहितीचे अधिकृत सत्यापन होईपर्यंत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
Khalid Ka Shivaji
Hindu Rashtra Samanvay Samiti
Protest
Shivaji Maharaj
Historical Distortion
#KhalidKaShivaji #Protest #PuneNews #ShivajiMaharaj #HinduRashtraSamanvaySamiti #FilmControversy #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: