७.११ लाख रुपयांच्या लुटीचा छडा लावला
पुणे, दि. २७ ऑगस्ट, २०२५: पुण्याच्या खडकी परिसरातील रॉयल एनफिल्ड (बुलेट) शोरूममध्ये चाकूचा धाक दाखवून ७ लाख ११ हजार रुपयांची जबरी चोरी करणाऱ्या एका व्यक्तीला युनिट-४ गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीचे नाव प्रतीक भारत सावंत (वय २३) असून तो याच शोरूममध्ये काम करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ ऑगस्ट रोजी वाकडेवाडीतील ब्रह्मा मोटर्स रॉयल एनफिल्ड शोरूममध्ये एका अज्ञात व्यक्तीने वॉचमनच्या गळ्याला चाकू लावून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर, आरोपीने काउंटरमधील ड्रॉवरमधून ७ लाख ११ हजार रुपये जबरदस्तीने काढून पळ काढला होता.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीचा आधार घेतला. तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, प्रतीक सावंत यानेच ही चोरी केली असून तो महर्षीनगर भागात राहत आहे. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला अटक केली.
आरोपीकडे पुढील तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली ५० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
Pune Crime
Robbery
Pune Police
Royal Enfield
Arrest
#PunePolice #PuneCrime #Robbery #RoyalEnfield #CrimeNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: