मंत्री जयकुमार रावल यांच्या वडिलांचाही आंदोलनात सहभाग
धुळे, (प्रतिनिधी): उदना-जळगाव-पुणे अशी नवीन रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसह इतर अनेक वर्षांपासून रखडलेल्या मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यातील नरडाणा, दोंडाईचा आणि शिंदखेडा या तीन रेल्वे स्टेशनवर स्थानिक प्रवासी आणि ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी 'रेल रोको' आंदोलन केले.
नरडाणा येथे आंदोलकांनी भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर गाडी अडवून रेल्वे रुळावर ठिय्या दिला. यावेळी, उदना-जळगाव-पुणे ही नवीन रेल्वे सुरू करावी, रात्री धावणाऱ्या सुरत गाड्या दिवसा सुरू कराव्यात, मुंबई गाडीच्या वेळेत बदल करावा, नरडाणा स्टेशनवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा आणि रेल्वे लाईनवर रेल्वे अंडरपास बोगदा मंजूर करावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून लवकरच मागण्या रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्यावर मार्ग काढू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. नरडाणा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. निलेश मोरे यांनीही आंदोलनकर्त्यांना शांत केले. या मागण्या पुढील तारखेपर्यंत पूर्ण न झाल्यास अमरण आंदोलन करण्याचा इशारा संजीवनी सिसोदे, सिद्धार्थ सिसोदे, राजेश बोरसे आणि प्रवीण देसले यांनी दिला आहे.
दरम्यान, दोंडाईचा येथे झालेल्या आंदोलनात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांचे वडील सरकार साहेबराव रावल स्वतः सहभागी झाले होते. त्यांनाही रेल्वे प्रशासनाने लवकरच मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. तसेच, मंत्री रावल यांनी स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून मार्ग काढणार असल्याचे नरडाणा भेटीत सांगितले.
Dhule
Rail Roko
Protest
Train Service
Maharashtra
#Dhule #RailRoko #Protest #Maharashtra #IndianRailways
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: