बचावकार्य युद्धपातळीवर सुरू; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
वसई, दि. २७ ऑगस्ट (प्रतिनिधी): वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील नारंगी येथील एका चार मजली इमारतीचा मागील भाग मंगळवारी मध्यरात्री कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून, ९ जण जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला.
नारंगी येथील 'रमाबाई अपार्टमेंट'चा भाग कोसळून शेजारील चाळीवर पडल्याने चाळीचे मोठे नुकसान झाले. यात १५ ते २० रहिवासी अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) तात्काळ मदत व बचावकार्य सुरू केले.
आज संध्याकाळपर्यंत मलब्यातून १४ जणांना बाहेर काढण्यात आले, त्यापैकी ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, मृतांमध्ये लक्ष्मण सिंग, आरोही ओंकार जोवील आणि उत्कर्षा जोवील यांची ओळख पटली आहे. या दुर्घटनेत ९ जण जखमी झाले असून, त्यांना वसई, नालासोपारा व विरार येथील रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मलब्याखाली अजूनही काही जण अडकले असण्याची शक्यता असल्याने अंधेरी येथून एनडीआरएफची अतिरिक्त तुकडी दाखल झाली असून, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शेजारील इमारती व चाळींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवार्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Vasai
Virar
Building Collapse
Disaster
Rescue Operation
NDRF
Maharashtra
#Vasai #Virar #BuildingCollapse #Maharashtra #Disaster #NDRF #MumbaiNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: