उपमुख्यमंत्र्यांकडून विविध विकासकामांची पाहणी; शिवसृष्टी व वनउद्यानाचा घेतला आढावा
बारामती, दि. २७ (प्रतिनिधी): कन्हेरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’मुळे पर्यटकांना इतिहासाची ओळख होण्यासह बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.
श्री. पवार यांनी आज बारामती परिसरातील शिवसृष्टी, कन्हेरी वन उद्यान परिसर, तांदुळवाडी येथील वृद्धाश्रम आणि तिरंगा चौकासह विविध विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी खासदार सुनेत्रा पवार त्यांच्यासोबत उपस्थित होत्या.
शिवसृष्टी या ऐतिहासिक थीम पार्कच्या कामाची पाहणी करताना श्री. पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडवणाऱ्या प्रतिकृतींबद्दल माहिती घेतली. या ठिकाणी शिवकाळातील आग्रा दरबार, राजसभा, राजगड प्रवेशद्वाराची प्रतिकृती तसेच थ्रीडी ॲनिमेशनद्वारे शिवकालीन युद्धाचा अनुभव घेता येणार आहे.
या भेटीदरम्यान त्यांनी कन्हेरी वन उद्यान परिसरातील विकास कामांचीही पाहणी केली. येथे सुरू असलेल्या 'ॲडव्हेंचर अँड नेचर क्लब'च्या साहसी खेळांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची त्यांनी प्रशंसा केली. अशा उपक्रमांमुळे युवा वर्गाला रोजगाराच्या नव्या संधी मिळतील आणि बारामतीच्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या पाहणी दौऱ्यात उप वनसंरक्षक महादेव मोहिते, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Ajit Pawar
Baramati
Shivsrushti
Tourism
Development Projects
Maharashtra
#AjitPawar #Baramati #Shivsrushti #Maharashtra #Tourism #DevelopmentProjects

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: