अग्निशमन दल, वाहतूक, स्वच्छता आणि सुरक्षा यंत्रणांनी नियोजन केले पूर्ण; विविध ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध
पुणे, दि. २६ ऑगस्ट २०२५, (प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासनाने शहरात जय्यत तयारी केली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुलभतेसाठी विविध विभागांनी नियोजन पूर्ण केले आहे. अग्निशमन दलापासून ते घनकचरा व्यवस्थापन विभागापर्यंत सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
सुरक्षा आणि बचाव कार्य
अग्निशमन दलाने गणेश विसर्जनाच्या वेळी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी १५ प्रमुख घाटांवर फायरमन आणि जीवरक्षकांची नेमणूक केली आहे. नदीपात्रात आडवा दोरखंड बांधण्यात आला असून, नागरिकांना शक्यतो नदीत न उतरता कृत्रिम हौदांमध्ये विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीदरम्यान मदतकार्य त्वरित देण्यासाठी टिळक चौक व नटराज सिनेमाजवळ बिनतारी संदेश मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत.
रस्ते, वीज आणि मूलभूत सुविधा
पुणे मनपाच्या पथ विभागाने शहरातील प्रमुख रस्ते, विशेषतः मध्यवर्ती भागातील १३ महत्त्वाच्या रस्त्यांची डागडुजी व दुरुस्ती पूर्ण केली आहे, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहील. नागरिकांना खड्डे किंवा रस्त्यांच्या स्थितीबद्दल तक्रार नोंदवण्यासाठी 'पीएमसी रोड मित्र' नावाचे नवीन ॲप सुरू करण्यात आले आहे. विद्युत विभागाने शहरातील सर्व पथदिवे व विद्युत खांबांची तपासणी केली असून, मंडपांसाठी अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, शहरातील ४२९ विसर्जन घाट व हौदांवर तात्पुरती प्रकाश व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
पर्यावरणपूरक उत्सव आणि स्वच्छता
यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर देण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील विविध ठिकाणी ३८ बांधलेले हौद, ६४८ लोखंडी टाक्या आणि २४१ मूर्ती संकलन केंद्रे उभारली आहेत. तसेच, निर्माल्य संकलनासाठी ३२८ कलश व कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. 'ईकोएक्झिस्ट' सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शाडू मातीच्या मूर्तींचे संकलन करून पुनर्वापर केला जाणार आहे. नागरिकांना मूर्ती नदीत विसर्जन न करता मूर्तीदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या सर्व सोयीसुविधांबरोबरच, मोटार वाहन विभागामार्फत मूर्ती व निर्माल्य वाहतुकीसाठी ७६० वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुणेकरांनी प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
PMC
Ganeshotsav
Pune
Safety
Eco-friendly
Preparations
#Ganeshotsav2025 #Pune #PMC #GaneshVisarjan #PublicSafety #EcoFriendly

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: