एम. एस. युनिव्हर्सिटीत १०० हून अधिक विद्यार्थिनींना अन्नबाधा
कुलगुरू, मुख्य वॉर्डन आणि खासदारांनी घेतली धाव; २५ हून अधिक विद्यार्थिनींना डिस्चार्ज
वडोदरा, ९ जुलै : गुजरातच्या वडोदरा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडोदरा येथील एम. एस. युनिव्हर्सिटीच्या सरोजिनीदेवी हॉल (Sarojini Devi Hall) येथे काल रात्री भोजन केल्यानंतर तब्बल १०० हून अधिक विद्यार्थिनींना अन्नबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुख्य वॉर्डन यांनी तात्काळ दखल घेतली आणि बाधित विद्यार्थिनींना युद्धपातळीवर उपचारांसाठी सयाजी रुग्णालयात (Sayaji Hospital) दाखल केले. रात्रीच्या जेवणानंतर विद्यार्थिनींना उलटी आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागला होता.
घटनेची माहिती मिळताच विद्यापीठाचे कुलगुरू (VC), मुख्य वॉर्डन डॉ. विजय परमार आणि स्थानिक खासदार यांनी रुग्णालयात धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, बाधित विद्यार्थिनींच्या आरोग्याची चौकशी केली.
आज सकाळपर्यंत २५ हून अधिक विद्यार्थिनींना प्राथमिक उपचार दिल्यानंतर रुग्णालयातून सुटी (Discharge) देण्यात आली आहे. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात एकच खळबळ उडाली असून, अन्नाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: