पुणे (प्रतिनिधी) - पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-१ ने मोठी कारवाई करत मेफेड्रोन (MD) या अंमली पदार्थाची अवैध विक्री करणाऱ्या तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १५.८४ लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १५ जुलै २०२५ रोजी बिबवेवाडी येथे करण्यात आली.
गुन्हे शाखा, पुणे शहर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना, बिबवेवाडी येथील निमंत्रण हॉटेलसमोर सार्वजनिक रोडवर पांढऱ्या रंगाच्या एका फोर-व्हीलर कारमध्ये रेकॉर्डवरील आरोपी अनिकेत विठ्ठल कुदळे आणि मोहम्मद जारून शेख हे त्यांच्या एका साथीदारासह संशयितरित्या बसलेले आढळले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यांची झडती घेतली.
या झडतीदरम्यान, आरोपी क्रमांक १) मोहम्मद जारून शेख (वय २७, रा. सिद्धी विनायक वैभव पांढवनगर, वडवाची वाडी रोड, उंड्री, पुणे) याच्या ताब्यातून ५,७६,८००/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. यामध्ये ५,०५,८००/- रुपये किमतीचे २५ ग्रॅम २९ मिलीग्रॅम मेफेड्रोन (MD) हा अंमली पदार्थ, ७०,०००/- रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, १,०००/- रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा, एक काळ्या रंगाचे गॉगल केस, दोन छोट्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि एक गुलाबी रंगाची प्लास्टिकची पिशवी यांचा समावेश आहे.
तसेच, आरोपी क्रमांक २) सॅम्युअल बाळासाहेब प्रताप (वय २८, रा. फ्लॅट नं. ०४, आंबेडकर बिल्डिंग, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे) याच्या ताब्यातून ६,८८,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात ६,३८,०००/- रुपये किमतीचे ३१ ग्रॅम ९ मिलीग्रॅम मेफेड्रोन (MD) हा अंमली पदार्थ आणि ५०,०००/- रुपये किमतीचा एक मोबाईल फोन मिळून आला.
आणि आरोपी क्रमांक ३) अनिकेत विठ्ठल कुदळे (वय २७, रा. फ्लॅट नं. १६, ओम नमः शिवाय अपार्टमेंट, मोदी गणपती जवळ, नारायण पेठ, पुणे) याच्या ताब्यातून ३,२०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात ३,००,०००/- रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची फोक्सवॅगन फोर-व्हीलर कार (एम.एच. १२ एफ.वाय. ०८७८) आणि २०,०००/- रुपये किमतीचा एक मोबाईल फोन असा एकूण १५,८४,८००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींविरुद्ध बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८(क), २२(क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर, प्रशांत अंबाडदरे, सहा. निरीक्षक अनिल सुरवसे, उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, अंमलदार संदीप शिके, विनायक साळवे, मारुती पारधी, दयानंद तेलंगे, सजेराव सरगर, नागनाथ राख, नितीन जाधव, सचिन माळवे, प्रवीण उतेकर, सुहास डोंगरे, विपुल गायकवाड, संदेश काकड, दत्ताराम जाधव, स्वप्नील मिसाळ यांनी पार पाडली.
Crime News, Drug Bust, Mephedrone, Pune Police, Arrest, Anti-Narcotics Cell.
#PunePolice #DrugBust #Mephedrone #MD #CrimeNews #Bibvewadi #PuneCrime #AntiNarcotics

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: