मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना 'संसदीय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान' पुरस्कार; दिल्लीत वितरण सोहळा
पिंपरी, दि. २६ जुलै २०२५: लोकसभेतील सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना 'प्राईम पॉईंट फाउंडेशन'तर्फे 'संसदीय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान' (Effective Sustained Contribution in Parliamentary Democracy) या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
मागील पुरस्कारांची मालिका
खासदार बारणे यांना यापूर्वी 'प्राईम पॉईंट फाउंडेशन'तर्फे पाच वेळा 'संसदरत्न', एक वेळा 'संसदमहासंसदरत्न' आणि एकदा 'संसद विशिष्टरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्काराची संकल्पना आणि वितरण
लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना 'प्राईम पॉईंट फाउंडेशन'तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. फाउंडेशनतर्फे दरवर्षी लोकसभा, राज्यसभेतील विशेष कामगिरी केलेल्या खासदारांना सन्मानित करण्यात येते. यंदा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजूजी यांच्या हस्ते खासदार बारणे यांना या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ज्युरी कमिटीचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, 'प्राईम पॉईंट फाउंडेशन'चे अध्यक्ष के. श्रीनिवास, प्रियदर्शनी राव, ज्येष्ठ खासदार भर्तृहरी महताब उपस्थित होते.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजूजी म्हणाले, "जगातील खासदारांच्या तुलनेत भारतातील खासदारांचे जीवन संघर्षमय आहे. सकाळी उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत लोकांची कामे करावी लागतात. त्यांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. गटार तुंबणे, रस्त्यावरील खड्डे ते देशातील असे विविध प्रकारची कामे करावी लागतात. त्यासाठी सतत कार्यरत राहून खासदारांना खूप कामे करावी लागतात. पुरस्कार मिळालेले खासदार संसदेतील प्रभावशाली आहेत. अनेक वर्षांचा त्यांचा संसदेतील दांडगा अनुभव आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. 'प्राईम पॉईंट फाउंडेशन'तर्फे पुरस्कार मिळणारे खासदार भाग्यवान आहेत."
सभागृहात ९६ टक्के उपस्थिती आणि लोकहिताची कामे
चालू १८ व्या लोकसभेत खासदार बारणे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम आहे. त्यांची सभागृहात ९६ टक्के उपस्थिती आहे. त्यांनी १४८ प्रश्न विचारले आहेत, ३६ चर्चांमध्ये सहभाग घेतला आहे, तर एका वर्षाच्या कालावधीत ३ खासगी विधेयके मांडली आहेत. खासदार बारणे यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत.
खासदार बारणे यांनी केवळ संसदेत आवाज उठविला नाही, तर प्रत्यक्षात जमिनीवर काम देखील केले आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मावळमधील आदिवासी पाडे, वाड्या-वस्त्यांवर वीज आणि रस्त्यांची सुविधा निर्माण केली. गावा-गावांमधील अंतर्गत रस्ते, पाण्याची सुविधा सक्षम केली. स्वखर्चाने पवना धरणातील गाळ काढून पिंपरी-चिंचवडकरांच्या पाण्याची सोय केली. पिंपरीत पासपोर्टचे कार्यालय सुरू केले. क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या नावाने टपाल तिकीटाचे प्रकाशन केले. एच.ए. कंपनीला आर्थिक मदत मिळवून दिली. पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला गती दिली आहे. रेल्वेचे जाळे विस्तारले जात आहे. पनवेलला लोकल सुरू झाली. अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जात आहे. लोणावळा ते पुणे या दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. संसदेतील भाषणांबरोबरच जमिनीवरही खासदार बारणे यांनी काम केले आहे.
"जनतेसाठी अनेक आंदोलने, संघर्ष केला. नगरसेवक ते खासदार हा प्रवास संघर्षमय आहे. मावळच्या जनतेने सलग तीनवेळा लोकसभेत काम करण्याची संधी दिली. हा पुरस्कार मावळच्या जनतेला समर्पित करतो. माझ्या जडणघडणीत अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी साथ दिली. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी लोकसभेत चांगले काम करीत आहे. त्यामुळे हा पुरस्कार मिळाला. लोकसभेसह स्थानिक पातळीवर जनतेची काम करण्यावर भर दिला आहे," असे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.
Pimpri, Maval, Shiv Sena, MP, Shrirang Barne, Awards, Lok Sabha, Prime Point Foundation, Parliamentary Democracy, Delhi, Maharashtra Sadan, Kiran Rijuji, Hansraj Ahir, Dr. APJ Abdul Kalam, Sansad Ratna
#MPShriRangBarane #Maval #LokSabha #Award #ParliamentaryPerformance #PrimePointFoundation #Pimpri #ShivSena #Delhi #Maharashtra #ParliamentaryAward
Reviewed by ANN news network
on
७/२६/२०२५ ०४:१९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: