पाणलोट क्षेत्रात दमदार पावसामुळे पाणी पातळीत मोठी वाढ; एका दरवाजातून विसर्ग सुरू
सातही धरणांमध्ये ७२.६१ टक्के जलसाठा उपलब्ध; मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली
मुंबई, १० जुलै (प्रतिनिधी): मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांपैकी एक महत्त्वाचे धरण असलेला मोडक सागर तलाव आज सकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे. पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली असून, मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे दिलेल्या माहितीनुसार, मोडक सागर तलाव पूर्ण भरल्यामुळे त्याचा एक दरवाजा १ फूट उघडण्यात आला असून, त्यातून १०२२ क्युसेक प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मोडक सागर तलावाची कमाल जलधारण क्षमता १२८९२.५ कोटी लीटर इतकी आहे.
गेल्या वर्षी, २०२४ मध्ये २५ जुलै रोजी, तर २०२३ मध्ये २७ जुलै रोजी मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागला होता. यंदाही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तलाव भरल्याने दिलासा मिळाला आहे.
इतर धरणांची स्थिती: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी 'हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' ७ जुलै रोजीच सुमारे ९० टक्के भरले होते. या धरणाचेही तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत.
एकूण जलसाठा: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर इतकी आहे. आज पहाटे ६ वाजता केलेल्या मोजणीनुसार, या सर्व सातही तलावांमध्ये मिळून १०५०९१.२ कोटी लीटर जलसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा एकूण जलसाठ्याच्या तुलनेत ७२.६१ टक्के इतका आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महत्त्वाचे तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने मुंबईची पाणीटंचाईची समस्या दूर झाली असून, पुढील काही महिने पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: