जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या परतीच्या पालखीचे शनिवारी पिंपरी चिंचवड शहरात आगमन; प्रशासकीय यंत्रणा सज्ज
पिंपरी, १७ जुलै २०२५: आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी (१९ जुलै) रोजी दुपारी होत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाजवळील चौकात पालखीचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.
अतिरिक्त आयुक्तांकडून तयारीचा सविस्तर आढावा
पालखीच्या स्वागताच्या आणि मार्गावरील सोयी-सुविधांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी संबंधित विभागप्रमुखांसोबत बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, माणिक चव्हाण, मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, तानाजी नरळे, अतुल पाटील, अजिंक्य येळे, किशोर ननावरे, अश्विनी गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालखी मार्गावर सोयीसुविधा पुरवण्याचे निर्देश
अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना पालखी मार्गावर स्वच्छता, विद्युत व्यवस्था, वैद्यकीय मदत केंद्रे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वाहतूक व्यवस्थापन आणि रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना केली. आरोग्य, वैद्यकीय, पाणीपुरवठा, विद्युत, उद्यान आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी आपापसात समन्वय साधून नियोजनबद्ध काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
पालखीचा शहरातून परतीचा प्रवास मार्ग
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा शनिवारी (१९ जुलै) रोजी पिंपरी गाव येथील भैरवनाथ मंदिरात मुक्काम असणार आहे. रविवार, २० जुलै रोजी पालखी पिंपरी येथून लिंकरोड भाटनगर मार्गे चिंचवडगाव, चिंचवड स्टेशन (पहिली विश्रांती), के.एस.बी.चौक (दुसरी विश्रांती), लांडेवाडी चौक (दुपारचा मुक्काम), भोसरी, आळंदी रोड, मॅगझिन चौक, थोरल्या पादुका (तिसरी विश्रांती) आणि धाकट्या पादुका मार्गे श्री. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, आळंदी येथे मुक्कामी जाणार आहे. त्यानंतर सोमवारी, २१ जुलै रोजी पालखी आळंदीहून देहूफाटा, डुडुळगाव, नागेश्वर मंदिर मोशी, चिखली, तळवडे, विठ्ठलवाडी मार्गे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर, देहू याप्रमाणे प्रवास करून परतीच्या प्रवासाचा समारोप करणार आहे.
महापालिकेकडून व्यापक व्यवस्थापन
महापालिकेच्या वतीने मार्गावरील स्वच्छता, पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, प्राथमिक उपचार केंद्रे आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात येणार आहे. विद्युत विभागाकडून रस्त्यांवर प्रकाश योजना, तात्पुरते एल.ई.डी. दिवे व सी.सी.टी.व्ही. यंत्रणा बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस विभागासोबत समन्वयाने पर्यायी मार्ग आखण्यात येणार आहेत. तसेच, संबंधित क्षेत्रीय व संबंधित अधिकाऱ्यांनी देहू संस्थानच्या विश्वस्त मंडळींशी समन्वय साधून पालखी मार्गावर आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवाव्यात, असे निर्देशही अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले आहेत.
Sant Tukaram Maharaj Palkhi, Pimpri Chinchwad, PCMC, Ashadhi Ekadashi, Wari, Dehu, Alandi, Pilgrimage, Traffic Management
#SantTukaramPalkhi #PimpriChinchwad #Wari #AshadhiEkadashi #PCMC #Pilgrimage #Maharashtra #Dehu #Alandi

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: