म्हाडा कोकण मंडळाची ५,२८५ सदनिका आणि ७७ भूखंडांसाठी सोडत जाहीर अर्ज नोंदणी प्रक्रिया आज १४ जुलैपासून सुरू; अंतिम सोडत ३ सप्टेंबर रोजी
आज सोमवार, दिनांक १४ जुलै २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता 'म्हाडा'चे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते 'गो-लाइव्ह' कार्यक्रमांतर्गत अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला.
सदनिका आणि भूखंडांचा तपशील:
कोकण मंडळाने जाहीर केलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागली आहे:
२० टक्के सर्वसमावेशक योजना: ५६५ सदनिका
१५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना: ३००२ सदनिका
म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना आणि विखुरलेल्या सदनिका (सद्यस्थितीत): १६७७ सदनिका
म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (५० टक्के परवडणाऱ्या सदनिका): ४१ सदनिका
म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (भूखंड): ७७ भूखंड
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत: १३ ऑगस्ट २०२५, रात्री ११.५९ वाजेपर्यंत
अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा करण्याची अंतिम मुदत: १४ ऑगस्ट २०२५, रात्री ११.५९ वाजेपर्यंत
स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्धी: २१ ऑगस्ट २०२५, सायंकाळी ६.०० वाजता (म्हाडाच्या
या संकेतस्थळावर)https://housing.mhada.gov.in प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवण्याची अंतिम मुदत: २५ ऑगस्ट २०२५, सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत
स्वीकृत अर्जांची अंतिम यादी प्रसिद्धी: ०१ सप्टेंबर २०२५, सायंकाळी ०६.०० वाजता (म्हाडाच्या संकेतस्थळावर)
संगणकीय सोडत जाहीर: ०३ सप्टेंबर २०२५, सकाळी १०.०० वाजता, डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे.
अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएसद्वारे, ई-मेलद्वारे आणि ॲपवर प्राप्त होणार आहे.
पारदर्शकतेवर भर आणि आवाहन:
सोडतीसंदर्भात अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी ०२२ - ६९४६८१०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी सोडतीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आवाहन केले आहे की, नवीन संगणकीय सोडत प्रणाली ही पूर्णतः ऑनलाईन आणि पारदर्शक असून, यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मानवी हस्तक्षेपाला वाव नाही. या सदनिकांच्या विक्रीसाठी मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार किंवा प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाहीत. त्यामुळे अर्जदारांनी कोणत्याही त्रयस्थ/दलाल/मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस कोकण मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. अर्जदारांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच सोडत प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: