पुणे शहर, (२ जुलै): पुणे गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकलवरून जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना मुद्देमालासह जेरबंद केले आहे. या आरोपींकडून दोन मोबाईल फोन आणि गुन्ह्यासाठी वापरलेली स्प्लेंडरप्लस मोटारसायकल असा एकूण ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखा युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै रोजी गुन्हे शाखा युनिट ४ चे पथक येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार अमजद शेख आणि देविदास वांजळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, येरवडा पोलीस स्टेशन गुरनं ४२४/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०४ (२), ३ (५) या गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपी रामवाडी स्मशानभूमी, येरवडा, पुणे येथे येणार आहेत.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ रामवाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रोडवर सापळा रचला. तिथे दोन संशयित इसम पोलिसांना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे नाव सिद्धार्थ रमेश गायकवाड (वय १९, रा. गांधीनगर, रामवाडी, येरवडा, पुणे) आणि सद्दाम इसाफ पठाण (वय २०, रा. रामनगर, वाकड, पुणे) असे सांगितले.
पोलिसांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी सावंत पेट्रोल पंप ते कॉमर्स झोन या रोडने पायी जात असलेल्या एका व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकावून त्यांच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून पळून गेल्याची कबुली दिली. सदरबाबत येरवडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.
या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपींचे अंगझडती पंचनामे करून त्यांच्या ताब्यातील एक वन प्लस नॉर्ड-४ कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल फोन, एक पोपटी व आकाशी रंगाचा ओपो कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट आणि एक काळ्या रंगाची स्प्लेंडरप्लस मोटारसायकल (क्र. MH-१२-VH-४०६६) असा एकूण ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट ४ चे वरिष्ठ निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक विजयकुमार घुगे, अंमलदार अमजद शेख, मनोज साळुंके, सुनील नाईक, दत्तात्रय फुलसुंदर, प्रविण भालचिम, देविदास वांजळे, विशाल शिंदे, स्वप्नील लोणकर, राहुल घुले, प्रशांत सपकाळ आणि प्रविण जाधव यांनी केली.
Robbery, Mobile Snatching, Arrest, Pune Crime, Yerwada, Crime Branch, Two-Wheeler
#PunePolice #Robbery #MobileTheft #Yerwada #CrimeNews #BikeSnatching #Pune

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: