मधुमेहावर प्रभावी ठरणारे सॅनोफीचे मौखिक औषध उपलब्ध करण्यासाठी एमक्युअरचा पुढाकार; कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण करार
मुंबई, १७ जुलै २०२५: भारतात मधुमेही रुग्णांची वाढती संख्या वैद्यकीय क्षेत्रासाठी चिंतेचा विषय बनली असताना, एमक्युअर फार्माक्युटिकल्स लिमिटेड कंपनीने मधुमेहींसाठी तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एमक्युअर फार्माक्युटिकल्स लिमिटेड आणि सॅनोफी इंडिया लिमिटेड यांनी सॅनोफीच्या तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या मधुमेहाच्या औषधांचा प्रसार वाढवण्यासाठी विशेष वितरण भागीदारीची आज मुंबईत घोषणा केली.
सॅनोफीची अत्याधुनिक औषधे रुग्णांना उपलब्ध
या सहकार्यामुळे सॅनोफीची मधुमेहावर नियंत्रण आणणारी अत्याधुनिक औषधे आता भारतातील मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी अधिक सुलभतेने उपलब्ध झाली आहेत. एमक्युअर फार्माक्युटिकल्स लिमिटेडने या औषधांमुळे मधुमेहग्रस्त रुग्णांवर प्रभावी उपचारपद्धती उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. 'Amaryl®' आणि 'Cetapin®' या भारतात अनेक वर्षांपासून वापरल्या जाणाऱ्या दोन्ही औषधांचाही सॅनोफीच्या मधुमेह नियंत्रणासाठी उपलब्ध झालेल्या औषधामध्ये समावेश करण्यात आला आहे, ज्यांचे वितरण आणि प्रचार एमक्युअर करणार आहे.
विस्तृत नेटवर्कचा वापर करून पोहोच वाढवणार
सॅनोफी इंडिया लिमिटेडच्या भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय उत्पादन केंद्रांमध्ये या ब्रँडची मालकी आणि उत्पादन पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. एमक्युअर फार्माक्युटिकल्स लिमिटेड आपल्या मजबूत नेटवर्कचा वापर करून देशभरातील आरोग्यसेवा व्यावसायिकांशी संपर्क साधेल. या नेटवर्कच्या माध्यमातून मधुमेह नियंत्रणासाठी आवश्यक असलेले तोंडावाटे दिले जाणारे औषध अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचवता येईल, असे दोन्ही कंपन्यांनी म्हटले आहे. ही भागीदारी पूर्णतः उत्पादन वितरण आणि प्रचारापुरती मर्यादित असून, कर्मचारी पातळीवर कोणताही बदल केला जाणार नाही.
१० कोटींहून अधिक रुग्णांना फायदा अपेक्षित - एरिक मँशन
सॅनोफीचे फार्मा साऊथईस्ट आशिया व इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि एमसीओ लीड एरिक मँशन यांनी या भागीदारीबद्दल कंपनीची भूमिका मांडताना सांगितले की, “भारतात १० कोटींपेक्षा जास्त लोकांना मधुमेह टाईप-२ ची बाधा झाली आहे. टाईप-२ मधुमेहाशी झगडणाऱ्या या रुग्णांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित झाले आहे, ज्यामुळे ६० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांना दीर्घकालीन आणि गंभीर स्वरूपातील आरोग्याच्या समस्यांचा धोका संभवतो. एमक्युअरचे विस्तृत नेटवर्क आमच्या 'Amaryl®' आणि 'Cetapin®' या आघाडीच्या OADs (Oral Anti-Diabetic Drugs) औषधांचा विकास करण्याचे ध्येय यशस्वीपणे गाठण्यास मदत करेल. ही भागीदारी रुग्ण तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी खरोखरच फायदेशीर ठरेल.”
उत्तम दर्जाच्या उपचारपद्धतीसाठी कटिबद्ध - सतीश मेहता
सॅनोफी कंपनी लिमिटेडसोबत केलेल्या भागीदारीतून आपण रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे एमक्युअर फार्माक्युटिकल्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच व्यवस्थापकीय संचालक सतीश मेहता यांनी सांगितले. “रुग्णांना उत्तम दर्जाच्या उपचारपद्धती सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचे देशभरातील वितरण जाळे मजबूत असल्याने सॅनोफीची मधुमेह नियंत्रित करणारी मौखिक औषधे गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवली जातील. ही भागीदारी आमच्या मधुमेहासंबंधी धोरणाशी सुसंगत आहे,” असा विश्वास मेहता यांनी व्यक्त केला.
Diabetes Medication, Emcure Pharmaceuticals, Sanofi India, Oral Anti-Diabetic Drugs, Amaryl, Cetapin, Healthcare Partnership, India
#DiabetesCare #Emcure #Sanofi #OralMedication #HealthcarePartnership #IndiaHealth #DiabetesManagement

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: