पिंपरी, १७ जुलै २०२५: केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२४ स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहराने यंदा मोठी बाजी मारली आहे. देशभरातून सहभागी झालेल्या ४,५८९ शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडने सातवा क्रमांक पटकावला असून, महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर येण्याचा मान मिळवला आहे. त्याचबरोबर, शहराने पुन्हा एकदा ७ स्टार गार्बेज फ्री सिटी (Garbage Free City) आणि वॉटर प्लस (Water Plus) असे प्रतिष्ठेचे मानांकनही प्राप्त केले आहे.
दिल्लीत पुरस्काराचे वितरण
दिल्ली येथे आज झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय नगरविकास आणि शहरी मंत्री मनोहरलाल खट्टर आणि राज्यमंत्री तोखन साहू यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि आरोग्य विभागाचे उपआयुक्त सचिन पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी सचिव श्रीनिवास कटिथिली, सेक्रेटरी रुपा मिश्रा, महापालिकेचे कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
कचरा व्यवस्थापन आणि नागरिक सहभागाचे फलित
स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत दरवर्षी शहरांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नागरिक सहभाग, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, शौचालये व मलनिस्सारण व्यवस्थेचे मूल्यांकन केले जाते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध उपाययोजनांमुळे शहरात कचऱ्याचे योग्य प्रकारे संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर आणि विल्हेवाट लावण्याचे कार्य नियमितपणे केले जात आहे. घराघरातून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करणे, स्रोताजवळ प्रक्रिया युनिट्स, कंपोस्टिंग, रीसायकलिंग प्लांट, बायोगॅस यंत्रणा आदींचा वापर यामुळे शहराला '७ स्टार कचरा मुक्त शहर' मानांकन मिळाले आहे.
शहरातील मलनिस्सारणाची कार्यक्षम व्यवस्था, सीवेज ट्रिटमेंट प्लांट, नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण आणि पुनर्वानपर यामुळे शहराने 'वॉटर प्लस' दर्जा मिळवला आहे. आरोग्य विभागाचे उप आयुक्त सचिन पवार यांनी सांगितले की, स्वच्छ सर्वेक्षण यशस्वी होण्यासाठी केवळ महापालिकेचे नव्हे, तर शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा व उद्योगांचे मोठे योगदान लाभले. नागरिकांनी नियमित कचरा वर्गीकरण, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक स्वच्छता यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
शहराचा स्वच्छतेतील आलेख चढता
गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहराने स्वच्छ सर्वेक्षणात सातत्याने प्रगती केली आहे.
२०१६ - ९
२०१७ - ७२
२०१८ - ४३
२०१९ - ५२
२०२० - २४
२०२१ - १९
२०२२ - १९
२०२३ - १०
२०२४ - ७
गतवर्षी देशात १० वा तर राज्यात तिसरा क्रमांक होता, जो यंदा राज्यात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
अधिकाऱ्यांचे मनोगत
शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका: "शहरातील स्वच्छतेसाठी झटणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे, सफाई कर्मचारी, अधिकारी वर्ग, आणि स्वयंसेवी संस्थांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. हा सन्मान आपणा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. येत्या काळात आपली जबाबदारी आणखी वाढली असून, त्यादृष्टीने आणखी अनेक शाश्वत उपक्रम राबविले जातील."
विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका: "महापलिकेला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये मिळालेला पुरस्कार कौतुकास्पद असून, आता पुढील उद्दिष्ट म्हणजे शाश्वत स्वच्छता, घनकचरा शून्य धोरण, जलपुनर्वापर आणि पर्यावरणपूरक शहर यासाठी प्रयत्न करणार आहोत."
सचिन पवार, उपआयुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका: "महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी, शहरातील प्रत्येक नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळेच आज देशात ७ वा तर राज्यात पहिला क्रमांक आला आहे. पुढील वर्षी देशात प्रथम क्रमांक यावा, यासाठी आतापासूनच विशेष खबरदारी घेतली जाईल."
Swachh Survekshan, Pimpri Chinchwad, Cleanliness Survey, Maharashtra Rank 1, India Rank 7, Garbage Free City, Water Plus, PMC, Urban Development, Awards
#SwachhSurvekshan #PimpriChinchwad #CleanCity #Maharashtra #PMC #GarbageFree #WaterPlus #UrbanDevelopment #IndiaClean

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: