ओबीसी जनगणनेचे महत्त्व घरोघरी जाऊन सांगणार : समीर भुजबळ

 


प्रदीप खंडू आहेर यांची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती

पिंपरी, पुणे (दि. २८ जुलै २०२५): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश पातळीवर ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) समाजाची जनगणना करण्याचे जाहीर केले आहे. ही जनगणना झाल्यानंतर ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शासकीय-निमशासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण मिळेल. हे लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचल्यानंतर ओबीसी समाज खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात सामील होईल, अशी माहिती माजी खासदार व समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांनी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ओबीसी जनगणनेचे आणि ओबीसी आरक्षणाचे फायदे सर्वसामान्य नागरिकांना कळावेत यासाठी पुढील काळात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे समता सैनिक घरोघरी जाऊन नागरिकांशी संपर्क साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरीत कार्यकर्ता आढावा बैठक 

पिंपरी येथे समता परिषदेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सोमवारी (दि. २८) आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत समीर भुजबळ बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, पिंपरी चिंचवडचे ज्येष्ठ नेते वसंत नाना लोंढे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष प्रदीप खंडू आहेर, वंदना जाधव, आनंदा कुदळे, विजय लोखंडे, राजेंद्र करपे, मच्छिंद्र दरवडे, पी. के. महाजन, कविता खराडे, विद्या भुजबळ, राजू भुजबळ, माणिक म्हेत्रे, हनुमंत माळी, महेश भागवत, प्रदीप जगताप, नकुल महाजन आदी उपस्थित होते.

नवीन अध्यक्ष आणि समता परिषदेचे कार्य

समीर भुजबळ यांनी सांगितले की, प्रदीप खंडू आहेर यांची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच नवीन शहर कार्यकारणी जाहीर करण्यात येईल. माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली समता परिषदेचे कार्य देशभरात सुरू आहे. यामध्ये स्वर्गीय कृष्णकांत कुदळे, हरी नरके यांच्यासारख्या ज्येष्ठांचे देखील उल्लेखनीय योगदान आहे. पुण्यातील महात्मा जोतीराव फुले वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर आणि लोकार्पण, नामांतराचा लढा, भिडे वाडा तसेच ओबीसींच्या हक्कांसाठी संघटन उभारत असताना देशभरात लाखो नागरिकांच्या उपस्थितीत यशस्वी मेळावे घेतल्याचे भुजबळ यांनी अधोरेखित केले.

ओबीसी आरक्षणाबाबत समता परिषदेची भूमिका

समता परिषद ही ओबीसींसह भटक्या विमुक्त जाती, जमाती, आदिवासी, मुस्लिम समाजातील ओबीसी तसेच मागासवर्गीय जाती व सर्वच उपेक्षित समाजासाठी काम करणारी संस्था आहे, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "ओबीसींच्या मूळ आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले, तर आमची हरकत नाही. परंतु, ईडब्ल्यूएसमधून (EWS) मराठा समाजाला आरक्षण मिळत आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे." मूळ कुणबी समाज प्रामुख्याने विदर्भ, कोकण, नाशिकमध्ये जास्त प्रमाणात आहे आणि मूळ कुणबी समाजाचे देखील हेच मत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील असे सांगताना समीर भुजबळ यांनी माहिती दिली की, या निवडणुका भाटिया आयोग नेमण्याच्या अगोदर असणाऱ्या ओबीसींच्या आरक्षित जागा गृहीत धरून म्हणजेच २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहेत. भाटिया आयोगाने दिलेल्या अहवालानुसार ओबीसी समाजाच्या राज्यात ३३ हजार जागा कमी होत होत्या. त्यामुळे भाटिया आयोगाच्या अहवालास माननीय सर्वोच्च न्यायालयात आम्ही आव्हान दिले होते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने आमचे अपील ग्राह्य धरून २०११ च्या जनगणनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. आता लवकरच निवडणुका जाहीर होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


OBC Census, Samata Parishad, Sameer Bhujbal, Pradeep Khandu Aher, Pimpri Chinchwad, OBC Reservation, Local Body Elections, Chhagan Bhujbal, Maharashtra Politics

 #OBCCensus #SamataParishad #SameerBhujbal #OBCReservation #PimpriChinchwad #MaharashtraPolitics #LocalElections #ChhaganBhujbal

ओबीसी जनगणनेचे महत्त्व घरोघरी जाऊन सांगणार : समीर भुजबळ ओबीसी जनगणनेचे महत्त्व घरोघरी जाऊन सांगणार : समीर भुजबळ Reviewed by ANN news network on ७/२८/२०२५ ०९:१२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".