पुणे, (३० जून): पुणे शहरातील मार्केट यार्ड वाहतूक विभागांतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कात्रज-कोंढवा रोडवरील कान्हा हॉटेल (शत्रुंजय मंदिर) ते गंगाधाम चौक, तसेच टिळेकर चौक कोंढवा ते गंगाधाम चौक आणि वखार महामंडळ चौक ते सेव्हन लव्हज चौक या मार्गावर सकाळी ८:०० वाजल्यापासून रात्री १०:०० वाजल्यापर्यंत (२२:०० वा) ट्रक, मिक्सर, डंपर, कंटेनर आणि इतर सर्व प्रकारच्या जड/अवजड वाहनांना वाहतुकीसाठी जाण्यास व येण्यास प्रवेश मनाई करण्यात आली आहे.
हा आदेश महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या दिनांक २७/०९/१९९६ रोजीच्या अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून देण्यात आला आहे. रात्री १०:०० वाजल्यापासून सकाळी ०८:०० वाजेपर्यंत मात्र या वाहनांना वाहतुकीस जाण्यास व येण्यास मुभा राहील, असेही वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या आदेशातून अत्यावश्यक सेवेतील वाहने जसे की, फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादींना वगळण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पुणे वाहतूक पोलिसांनी सांगितले. या निर्णयामुळे कात्रज-कोंढवा रोडवरील वाहतूक अधिक सुरक्षित आणि वेगवान होईल अशी अपेक्षा आहे.
पुणे शहर वाहतूक शाखेच्या पोलीस उप-आयुक्त अश्विनी राख यांनी हे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. या आदेशाची माहिती संबंधित दुकानदार, प्रतिष्ठित व्यक्ती आणि स्थानिक नागरिकांना तात्काळ देऊन त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात याव्यात आणि अंतिम प्रेसनोट सादर करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, ही प्रेसनोट पुणे वाहतूक पोलीस वेबसाईट आणि फेसबुकवरही प्रसिद्ध करण्याची विनंती करण्यात आली आहे.
Traffic Regulations, Pune Traffic Police, Road Safety, Kondhwa, Katraj, Heavy Vehicles
#PuneTraffic #TrafficRules #RoadSafety #Kondhwa #Katraj #PuneNews #TrafficBan #HeavyVehicles

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: