शिवरायांचे १२ किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट; पुण्यात पेढे वाटून जल्लोष

 


संस्कृतीचे प्रतीक असलेल्या पारंपरिक वेशभूषेत नागरिकांचा आनंदोत्सव; गणेशोत्सवाला 'राज उत्सव' मान्यता मिळाल्यानेही आभार

पुणे, दि. १२ जुलै २०२५: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या उपस्थितीत पेढे वाटून या अभिमानास्पद घोषणेचा जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्यात आपल्या संस्कृतीचे प्रतीक असणारी पारंपरिक वेशभूषा तसेच भगवे फेटे घालून सर्वजण उपस्थित होते. एकमेकांना पेढे देऊन तोंड गोड करत फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणांनी यावेळी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

'प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब': 

या प्रसंगी बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेली दुर्गसंस्कृती ही मराठा साम्राज्याच्या असामान्य लष्करी ताकदीचे प्रतीक आहे. आज त्या गडकोटांना जागतिक मान्यता मिळणे ही प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हा गौरव महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानासाठी अभिमानास्पद आहे." या निर्णयामुळे राज्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, तसेच आतापर्यंत जगाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती होता, पण आता त्यांच्या किल्ल्यांची महतीही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांनी विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले.


गणेशोत्सवाला 'राज उत्सव' म्हणून मान्यता मिळाल्याने सरकारचे आभार

आमदार हेमंत रासने यांनी गणेशोत्सवाला 'राज उत्सव' म्हणून मान्यता दिल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले. ते म्हणाले, "गेली ३५-४० वर्षे गणेशोत्सवाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना, १८९३ साली लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून समाज संघटित करण्याकरिता ज्या गणेशोत्सवाची सुरुवात झाली. स्वातंत्र्यानंतर मागील ७५ वर्षांत स्वराज्याचे सुराज्य निर्माण करण्याकरिता लाखो कार्यकर्त्यांची निर्मिती ज्या गणेशोत्सवाने केली, तो गणेशोत्सव आज महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव म्हणून १७५ देशांमध्ये साजरा होतो."

लाखो विदेशी पर्यटक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुण्यनगरीत येतात. असा हा जगाच्या पाठीवर पोहोचलेला उत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित करावा, अशी मागणी आपण विधानसभेत केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या मागणीला मान्यता दिल्याने त्यांचे मनःपूर्वक आभार, असे रासने यांनी म्हटले आहे.



शिवरायांचे १२ किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट; पुण्यात पेढे वाटून जल्लोष शिवरायांचे १२ किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट; पुण्यात पेढे वाटून जल्लोष Reviewed by ANN news network on ७/१२/२०२५ ०२:५३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".