सातारा, ०४ जुलै २०२५: वाई पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बिपीन बाळकृष्ण चव्हाण आणि पोलीस हवालदार उमेश दत्तात्रय गहिण या दोघांना पंधरा हजार रुपयांची लाच घेताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अधिकाऱ्यांनी रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पोलिसांमधील भ्रष्ट व्यवहार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
तक्रारदार व्यक्तीविरोधात एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी या दोघांनी लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. लाच मागणीच्या पडताळणीमध्ये दिनांक ४ जुलै २०२५ रोजी वाई पोलीस ठाण्याच्या आवारात हवालदार गहिण याने उपनिरीक्षक चव्हाण याच्यासाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
या माहितीच्या आधारे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदारावर गुन्हा दाखल न करण्यासाठी पंचासमक्ष २० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती, जी तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारताना प्रशासकीय इमारतीमधील पोलीस ठाण्याच्या बीट अंमलदार कक्षात त्यांना ताब्यात घेण्यात आले. उपनिरीक्षक चव्हाण आणि हवालदार गहिण यांनी लाचेची मागणी करताना तक्रारदारास शिवीगाळ, दमदाटी करून आणि हाताने चापटी मारून अटक करण्याची भीती दाखवली होती, असे पडताळणीत समोर आले आहे.
तक्रारदाराने लाच मागणीस होकार दर्शवताच, 'सांगेल तेव्हा साक्षीदार व्हायचं,' असे बोलून हवालदार गहिण याने लाच मागणीस प्रोत्साहन दिले. लाच स्वीकारतानाच लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई सातारा लाचलुचपत विभागाचे उपनिरीक्षक राजेश वाघमारे, पोलीस हवालदार नितीन गोगावले, गणेश ताटे, निलेश राजपुरे यांनी केली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे करत आहेत.
Crime, Bribery, Police Corruption, Satara, Wai, ACB, Arrest
#WaiPolice #SataraACB #Bribery #PoliceCorruption #Arrest #MaharashtraPolice #CrimeNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: