भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत; मोदी-फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त
'राज्याच्या विकासात अग्रेसर बनवण्यासाठी झटून काम करूया' - रविंद्र चव्हाण यांचे आवाहन
लातूर, ११ जुलै २०२५: लातूर जिल्ह्यातील चाकूर नगरपंचायतीचे माजी अध्यक्ष आणि प्रहारचे नेते कपील माकणे, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निळकंठ मिरकले यांच्यासह शरद पवार गट आणि 'प्रहार'च्या असंख्य कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (आज) भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ. अजित गोपछडे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अर्चना पाटील चाकूरकर, मराठवाडा विभागीय संघटनमंत्री संजय कोडगे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. यावेळी शरद पवार गटाचे डॉ. गोविंद माकणे आणि चाकूर कृ.उ.बा.स. उपसभापती लक्ष्मण दंडिमे यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास:
या पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. "आपण सर्वजण भाजपाची राष्ट्रीय विचारधारा मजबूत करण्यासाठी तसेच राज्याला विकासात अग्रेसर बनवण्यासाठी झटून काम करूया," असे आवाहन त्यांनी केले. या कार्यकर्त्यांनी मांडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी कसून प्रयत्न करण्यात येतील, असेही चव्हाण यांनी नमूद केले.
प्रवेशावेळी श्री. कपील माकणे म्हणाले की, त्यांना नगराध्यक्ष करण्यात भाजपचा सिंहाचा वाटा होता आणि त्यानंतरही वेळोवेळी विकासकार्यात भाजपने सहकार्य दिले. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी लातूरमधील योजनांना नेहमीच पाठबळ दिले आहे आणि प्रवेश केलेले सर्व कार्यकर्ते पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक नेतृत्वाकडे आशेने पाहत आहेत. प्रवेश केलेले सर्व कार्यकर्ते पक्षाची विचारधारा बळकट करतील, असे अर्चना पाटील चाकूरकर यांनी सांगितले.
भाजपात प्रवेश केलेले प्रमुख कार्यकर्ते:
यावेळी भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबूराव सूर्यवंशी, दत्ता कलाले, मुरंबीचे सरपंच सुनील चिंताले व उपसरपंच ज्ञानोबा चावले, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष दयानंद सूर्यवंशी, युवा शहराध्यक्ष अमोल शेटे, चाकूर नगर पंचायत गटनेता हिरकनबाई लाटे, औद्योगिक वसाहत संचालक बाळू लाटे आदींचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: