कार्यक्रमस्थळी पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिकाऱ्याना सूचना
१४ जुलै रोजी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक; सामाजिक संघटनांना उपस्थित राहण्याचे आवाहन
पिंपरी, ११ जुलै २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. यंदाही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर फ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी आज (शुक्रवार) कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.
स्थळ पाहणी दरम्यान उपस्थित मान्यवर :
या पाहणी दरम्यान मेट्रो व्यवस्थापनेचे व्यवस्थापक धनंजय कृष्णन, येतेंद्र कुलकर्णी, युवराज गावंडे, महापालिका स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता विजय वाईकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ यांच्यासह समितीचे अन्य पदाधिकारी आणि महापालिका व मेट्रोचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी कार्यक्रम स्थळाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच कार्यक्रमपूर्व आणि कार्यक्रमादरम्यान आवश्यक असलेल्या स्थापत्य, स्वच्छता, विद्युत सुविधा, मंच रचना, वाहनतळ व्यवस्था, महिला व वयोवृद्ध नागरिकांसाठी सुलभ मार्ग आदी बाबींविषयी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचनाही दिल्या. कार्यक्रम स्थळी उभारण्यात येणाऱ्या स्टेज, मंडप, प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था, व्यासपीठाचे डिझाईन, चित्रफिती किंवा पोस्टर्स, कार्यक्रमस्थळी परिसराची स्वच्छता व डासमुक्ती, वैद्यकीय सुविधा, अग्निशमन, पाणीपुरवठा आणि आपत्कालीन सुविधा यांची तयारी ठेवण्यात यावी, अशा सूचना क्षेत्रीय अधिकारी पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रबोधन पर्वातील उपक्रम:
दरवर्षी निगडी येथे होणाऱ्या या विचार प्रबोधन कार्यक्रमात प्रबोधनात्मक कार्यक्रमांसोबतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित परिसंवाद, विचारवंत वक्त्यांचे व्याख्यान, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, चित्रप्रदर्शन यांसारखे उपक्रमही राबविण्यात येतात. या प्रबोधन पर्वात विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये यांचाही सहभाग असतो.
आढावा बैठकीचे आयोजन:
या पार्श्वभूमीवर सोमवार, दिनांक १४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता महानगरपालिकेच्या दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाशी संबंधित महापालिका अधिकारी, पोलीस व मेट्रो प्रशासन, पी.एम.पी.एम.एल. अधिकारी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. शहरातील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी सदर बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: