'मुंबई महाराष्ट्राचीच, मराठी माणसाला न्याय दिला' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

विरोधकांच्या 'फेक नॅरेटिव्ह फॅक्टरी'वर मुख्यमंत्र्यांचा जोरदार हल्लाबोल

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकसित भारता'च्या स्वप्नासोबत 'विकसित महाराष्ट्र' हे भाजपचे ध्येय असून, राज्यातील दुष्काळ हा भूतकाळ ठरावा यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त आयोजित राज्य परिषद मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढविला.

लोकसभा निवडणुकीत 'फेक नॅरेटिव्ह'द्वारे जनतेची दिशाभूल करून मिळविलेले यश विधानसभेच्या निवडणुकीत 'थेट नॅरेटिव्ह'द्वारे आम्ही हिरावून घेतले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये 'बोलबच्चन भैरवी' सुरू होईल, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचे रडगाणे सुरू होईल; पण मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची ताकद कोणाकडेही नसून मुंबई महाराष्ट्राचीच आहे, असे त्यांनी ठणकावले. मुंबईवर वर्षानुवर्षे सत्ता गाजवणाऱ्यांनी मुंबई लुटली, सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजून मुंबई ओरपली आणि शेवटी कोंबडीचीच हत्या केली. त्यांनीच मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार केले, आणि या मराठी माणसाला आम्ही पुन्हा मुंबईत उभे केले, घर दिले, बीडीडी चाळी, अभ्युदयनगर, धारावीच्या विकासाचे प्रकल्प हाती घेऊन आम्ही मराठी माणसाला न्याय दिला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

या राज्यातील शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन घडविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आज महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. युवकांच्या हाताला काम, सामान्य माणसाच्या जीवनात समाधान हे आमच्या सत्तेचे सूत्र असून, दुष्काळ हा भूतकाळ ठरावा यासाठी मोदीजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे भविष्य घडविण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या निर्धाराचे स्वागत केले. मराठी ही आमची अभिमानभाषा असून, या महाराष्ट्रात केवळ मराठीचीच सक्ती असेल, पण आम्हाला हिंदीचाच नव्हे, तर देशातील प्रत्येक भाषेचा अभिमान आहे. भारतीय भाषांचा अपमान करून इंग्रजीला पायघड्या घालणाऱ्यांचा हिंदी विरोध आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

आपल्या तडाखेबंद भाषणात मुख्यमंत्र्यांनी पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पक्षकार्याच्या तळमळीची प्रशंसा केली. 'भाजप हा सामान्य कार्यकर्त्यास मोठे करणारा पक्ष असून, येथे अन्य पक्षांप्रमाणे परिवारातूनच पक्षाध्यक्ष निवडला जात नाही. या पक्षात सामान्य कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो, चहा विकणारा सामान्य माणूस पंतप्रधान होऊ शकतो, कारण या पक्षात एकमेकांशी परिवाराचे नव्हे, तर हिंदुत्वाचे, भारतीयत्वाचे नाते आहे,' असे ते म्हणाले. रवींद्र चव्हाण हे धाडसी, जिद्दी असून, त्यांच्या निवडीमुळे कोकणाला पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने एक मोठी उणीव भरून निघाली आहे, अशा शब्दांत त्यांनी श्री. चव्हाण यांच्या निवडीचे स्वागत केले. रात्रंदिवस पक्षकार्याला वाहून घेणारा व पक्ष विस्ताराच्या ध्यासाने झपाटलेला नेता असल्याने भविष्यात भाजप अधिक भक्कम होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कारकिर्दीचा गौरव करताना सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाखालीच विरोधकांच्या 'फेक नॅरेटिव्ह'ची फॅक्टरी आम्ही उद्‌ध्वस्त केली.

अटलजींच्या विचारांनी प्रेरित होऊन देशाला वैभवाप्रत नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षांत देशात परिवर्तन पर्व निर्माण केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या अर्थव्यवस्थेने जगातील चौथ्या क्रमांकाची उंची गाठली, २५ कोटी लोकसंख्या दारिद्य्राच्या खाईतून बाहेर आली, आणि 'ऑपरेशन सिंदूर'सारख्या धाडसी कारवाईतून जगाला भारताच्या शक्तीचे दर्शनही घडले. असे नेतृत्व लाभलेल्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत हे अभिमानास्पद आहे, असे उद्‌गार मुख्यमंत्र्यांनी काढले, तेव्हा सभागृहात पुन्हा एकदा जयजयकाराच्या घोषणा दुमदुमल्या.

Politics, Maharashtra, BJP, Devendra Fadnavis, Narendra Modi, Drought Relief, Mumbai, Fake News, Political Speech, State Council, Government

#MaharashtraPolitics #BJP #DevendraFadnavis #NarendraModi #VikasitMaharashtra #DroughtFreeMaharashtra #Mumbai #FakeNarrative #PoliticalSpeech #Maharashtra #BJPInMaharashtra

'मुंबई महाराष्ट्राचीच, मराठी माणसाला न्याय दिला' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मुंबई महाराष्ट्राचीच, मराठी माणसाला न्याय दिला' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Reviewed by ANN news network on ७/०१/२०२५ ०९:३७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".