'राष्ट्रवादाची विचारधारा सामान्य माणसांपर्यंत नेणार'; भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच रवींद्र चव्हाण यांचा निर्धार

 


'पक्षाने घडवले, पक्षासाठी काहीही करण्याची तयारी' - नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती

मुंबई: भारतीय जनता पार्टीची (भाजप) राष्ट्रवादाची विचारधारा तसेच मोदी सरकारचे लोकोपयोगी निर्णय राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सामान्य माणसांपर्यंत नेऊन पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या साथीने पार पाडेन, असा निर्धार भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केला. वरळी डोम येथे प्रचंड उत्साहात पार पडलेल्या पक्षाच्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात श्री. चव्हाण यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.

पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना श्री. चव्हाण म्हणाले की, माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या छोट्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीसारख्या मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाते, ही फार मोठी गोष्ट आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्येच हे घडू शकते. ही जबाबदारी सोपविल्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे. येत्या काळात भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादाची विचारधारा राज्याच्या कानाकोपऱ्यात न्यावयाची आहे. देशासाठी अहोरात्र काम करूनही मोदी सरकारबद्दल अपप्रचार केला जातो. हा अपप्रचार खोडून काढण्यासाठी आपणा सर्वांना मोदी सरकारची तसेच राज्यातील महायुती सरकारची कामे जनतेपर्यंत न्यायची आहेत. आता २०२९ ची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून आपल्याला तयारीला लागायचे आहे. रामभाऊ म्हाळगी यांनी सांगितल्याप्रमाणे 'पायाला भिंगरी लावून, डोक्यावर बर्फ ठेवून आणि तोंडात साखर ठेवून' कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. आगामी काळात राज्यात भारतीय जनता पार्टीला सशक्त बनविण्याचा संकल्प प्रत्येक कार्यकर्त्याने करायचा आहे, असेही श्री. चव्हाण यांनी नमूद केले. "भारतीय जनता पार्टी हीच माझी ओळख आहे. कारण मला पक्षानेच घडवले आहे. मला घडविणाऱ्या पक्षासाठी काहीही करण्याची आपली तयारी आहे," असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, तीन वर्षांपूर्वी माझ्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली गेली, तेव्हा ही जबाबदारी आपल्याला पेलवेल की नाही असे वाटत होते. मात्र देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आपण ही जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न केला. दीड कोटी सदस्य नोंदणीचा विक्रम सर्वांच्या सहकार्याने करता आला. लोकसभा निवडणुकीत अपेक्षेनुसार कामगिरी झाली नाही याची खंत आहे; मात्र विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक जागा मिळवल्या. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ५१ टक्के मते घेऊन सर्वाधिक संख्येने महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष निवडून आणण्याचा संकल्प साध्य करायचा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या लोकोपयोगी निर्णय सामान्य माणसापर्यंत नेण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावयाचे आहे, असेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले. त्यांनी यावेळी सर्व प्रदेश सरचिटणीस, पदाधिकारी आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांचे आभार मानले.

या सोहळ्यात हजारो कार्यकर्त्यांच्या उत्साही जल्लोषात, वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत केंद्रीय निवडणूक अधिकारी व केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी रवींद्र चव्हाण यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून मुंबईत अधिकृत घोषणा केली. श्री. चव्हाण यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, तर मावळते प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना पक्षाचा ध्वज देऊन प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे दिली.

या महत्त्वपूर्ण प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस व निरीक्षक अरुण सिंह, श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, पर्यावरण मंत्री व राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, भाजपा मुंबई अध्यक्ष व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती, माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे तसेच राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री उपस्थित होते.

Politics, Maharashtra, BJP, Leadership Change, Ravindra Chavan, Chandrashekhar Bawankule, Nationalism, Public Outreach, Government

#MaharashtraPolitics #BJP #RavindraChavan #ChandrashekharBawankule #LeadershipChange #Maharashtra #ModiGovernment #Nationalism #PoliticalNews #Mumbai


'राष्ट्रवादाची विचारधारा सामान्य माणसांपर्यंत नेणार'; भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच रवींद्र चव्हाण यांचा निर्धार 'राष्ट्रवादाची विचारधारा सामान्य माणसांपर्यंत नेणार'; भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच रवींद्र चव्हाण यांचा निर्धार Reviewed by ANN news network on ७/०१/२०२५ ०९:३४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".