पुणे : पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी पुणे वाहतूक शाखेने महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. वाहतूक पोलीस उप-आयुक्त हिंमत जाधव यांनी चार प्रमुख परिसरांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात 'नो पार्किंग' झोन आणि 'एकेरी वाहतूक' नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या नियमांमध्ये भारती विद्यापीठ परिसर, नांदेड सिटी, दत्तवाडीतील स्व. शंकरराव कावरे उद्यान आणि चतुःश्रृंगी येथील औंध डी.पी. रोड या भागांचा समावेश आहे. वाहतूक कोंडी कमी करणे आणि अपघातांना आळा घालणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
भारती विद्यापीठ परिसरात ४० मीटर 'नो पार्किंग' भारती विद्यापीठ वाहतूक विभागांतर्गत सातारा रोडवरील पूजा सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर तात्पुरत्या स्वरूपात ४० मीटरचा 'नो पार्किंग' झोन घोषित करण्यात आला आहे. यामध्ये प्रवेशद्वारासमोर डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी २० मीटर अंतरापर्यंत कोणत्याही वाहनाला पार्किंग करता येणार नाही.
नांदेड सिटी गेटजवळ 'नो पार्किंग' झोन नांदेड सिटी वाहतूक विभागांतर्गत नांदेड सिटी गेटच्या दोन्ही बाजूंना ५० मीटरपर्यंत आणि गेटसमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ५० मीटरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी 'नो पार्किंग' झोन लागू करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.
दत्तवाडीतील शंकरराव कावरे उद्यानाजवळ 'नो पार्किंग' दत्तवाडी वाहतूक विभागांतर्गत स्व. शंकरराव कावरे उद्यान (अक्षरबाग), तावरे कॉलनी येथील बाहेरील बाजूस आणि उद्यानाच्या समोर व आजूबाजूला असलेल्या सोसायट्यांमधील नागरिकांनी उद्यानाजवळ वाहने पार्क केल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन 'नो पार्किंग' झोन लागू करण्यात आला आहे. यामुळे वाहतुकीस निर्माण होणारा अडथळा दूर होईल.
औंध डी.पी. रोडवर 'एकेरी वाहतूक' चतुःश्रृंगी वाहतूक विभागांतर्गत औंध डी.पी. रोडवरील ज्ञानेश्वर मुरकुटे कमान येथून पायल टेरेस सोसायटी, विधाते वस्तीकडे जाणारा ३५० मीटरचा मार्ग तात्पुरत्या स्वरूपात एकेरी वाहतुकीसाठी घोषित करण्यात आला आहे. विधाते वस्ती, पायल टेरेस सोसायटी येथून ज्ञानेश्वर मुरकुटे कमान, औंध डी.पी. रोडला जाणाऱ्या वाहनांना आता रेझा पार्क सोसायटी मार्गे किंवा उजवीकडे वळण घेऊन शारदा पार्क सोसायटी मार्गे इच्छित स्थळी जावे लागेल.
या सर्व आदेशांबाबत नागरिकांना काही सूचना किंवा हरकती असल्यास, त्या पोलीस उप-आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला नं-६, एअरपोर्ट रोड, पुणे येथील कार्यालयात दिनांक २५/०१/२०२५ ते ०७/०४/२०२५ पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सूचना व हरकतींचा विचार करून, तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.) वगळून अंतिम आदेश काढण्यात येतील. हे सर्व निर्णय महाराष्ट्र शासन, गृह विभागाच्या अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायद्यातील कलम ११५, ११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून घेण्यात आले आहेत. यापूर्वी या ठिकाणी पार्किंगसंदर्भात असलेले कोणतेही आदेश रद्द करण्यात आले आहेत.
Pune Traffic, Traffic Regulations, No Parking, One-Way Traffic, Public Notice, City Planning #PuneTraffic #TrafficUpdate #NoParking #OneWayTraffic #PunePolice #TrafficRules #CityNews #HimmatJadhav

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: