खासदार मुरलीधर मोहोळ यांचे 24x7 नागरी सेवा देणारे अत्याधुनिक कार्यालय पुण्यात सुरू; 'नव्या कार्यपद्धतीची नवी सुरुवात'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १२ जुलै रोजी उद्घाटन; केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व समस्यांचे निराकरण एकाच छताखाली
नागरी सेवा, आरोग्य, शिक्षण, रोजगार यांसह ११ प्रमुख सेवा विभाग; सर्व सेवा डिजिटल व संगणकीकृत
पुणे, ११ जुलै २०२५: नागरिकांच्या केंद्र आणि राज्य शासनाशी संबंधित सर्व समस्या, मागण्या, योजनांचे मार्गदर्शन आणि तात्काळ सेवा मिळाव्यात यासाठी शहरात एक २४x७ सुरू असणारे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे संगणकीकृत नागरी सेवा कार्यालय जंगली महाराज रस्त्यावर, छत्रपती संभाजी बागेसमोर सुरू करण्यात आले आहे. नागरिक केंद्रबिंदू ठेवून आखलेली ही संकल्पना नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार, १२ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता करण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कार्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये व सेवा विभाग:
या कार्यालयाचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले असून, प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र काउंटरची व्यवस्था आहे. यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, तसेच पुणे मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा, पीएमआरडीए इत्यादी स्थानिक संस्थांशी संबंधित नागरी तक्रारींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
या कार्यालयात उपलब्ध असलेले प्रमुख सेवा विभाग खालीलप्रमाणे आहेत:
१. केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित सेवा मार्गदर्शन २. नागरी विमान वाहतूक विभागासाठी स्वतंत्र कक्ष ३. सहकार विभागासाठी स्वतंत्र काउंटर ४. रेल्वे व तीर्थयात्रांशी संबंधित मदत केंद्र ५. शासकीय योजना व लाभांसाठी मार्गदर्शन कक्ष ६. महा ई सेवा केंद्र – सर्व प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रे तत्काळ मिळण्याची सोय ७. नोकरी व स्वयंरोजगार विषयक मार्गदर्शन विभाग ८. स्वतंत्र वैद्यकीय सहायता कक्ष ९. दिव्यांग नागरिकांसाठी स्वतंत्र सहाय्य केंद्र १०. शैक्षणिक विभाग व शिष्यवृत्ती मार्गदर्शन केंद्र ११. कायद्याविषयक सल्ला व मदत कक्ष
या कार्यालयाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे संपूर्ण सेवा डिजिटल व संगणकीकृत स्वरूपात उपलब्ध असल्याने नागरिकांना रांगा लावाव्या लागणार नाहीत. डिजिटल टोकन, ई-डॉक्युमेंट सबमिशन आणि व्हर्च्युअल सल्ला सुविधा यामुळे हा अनुभव अधिक गतिमान आणि पारदर्शक ठरेल.
इतर कार्यक्रम व मान्यवरांचा सत्कार:
कार्यालयाच्या उद्घाटन समारंभा नंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या एक वर्षाच्या कार्य अहवालाचे आणि त्यांनी कोरोना काळातील स्वानुभवावर आधारित लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याच वेळी दोन सुसज्ज रुग्णवाहिकांचे लोकार्पणही होईल. प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रवींद्र चव्हाण हे पहिल्यांदाच पुण्यामध्ये सार्वजनिक कार्यक्रमासाठी येत असल्याने शहर भाजपच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
'सर्वसामान्य नागरिक हेच केंद्रबिंदू': मुरलीधर मोहोळ
केंद्रीय नागरी वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या कार्यालयाबद्दल बोलताना सांगितले की, "या कार्यालयाची रचना ही पूर्णतः नागरिक केंद्रित आहे. शासकीय यंत्रणांमध्ये वावरण्याचा त्रास, माहितीच्या अभावामुळे होणारी अडथळे आता दूर होतील. विशेषतः दिव्यांग नागरिक, ज्येष्ठ नागरिक, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठीही सुलभ मार्गदर्शन आणि सुविधा याठिकाणी उपलब्ध आहेत." हे कार्यालय केवळ सेवांची सुविधा पुरवणारे नसून, लोकशाही मूल्यांना बळकट करणारा एक उपक्रम म्हणून पाहिले जात असून, सर्व शासकीय सेवा एका छताखाली, २४ तास उपलब्ध करून देण्याची ही अभिनव संकल्पना भविष्यातील जनसंपर्क कार्यालयांसाठी एक रोल मॉडेल ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: