मुंबई: सकल मातंग समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, महाराष्ट्रात 'अ, ब, क, ड' या पद्धतीचे आरक्षण उपवर्गीकरण लवकरच लागू करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, तसेच उपवर्गीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार अमित गोरखे यांची प्रमुख उपस्थिती होती. याव्यतिरिक्त आमदार सुनील कांबळे, आमदार जितेश अंतापूरकर, माजी मंत्री दिलीप कांबळे, रमेश बागवे, तसेच समाजाचे अनेक मान्यवर आणि समाजकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार अमित गोरखे यांनी बैठकीचे प्रास्ताविक करताना उपवर्गीकरणाची आवश्यकता विशद केली. ते म्हणाले, “१ ऑगस्ट २०२४ रोजी राज्य शासनाने उपवर्गीकरणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी अजूनही प्रलंबित आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेश, हरियाणा आणि पंजाब या राज्यांनी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी सुरू केली असून, महाराष्ट्रातही ती तत्काळ लागू व्हावी." त्यांनी राज्य सरकारने २०११ च्या लोकसंख्येच्या प्रमाणावर आधारित अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण धोरण जाहीर करावे, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे, आगामी जनगणनेत मातंग समाजाच्या लोकसंख्येत वाढ झाल्यास, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक सरकारच्या धर्तीवर आरक्षण टक्केवारीत वाढ करण्याची कायदेशीर तरतूद महाराष्ट्रातही व्हावी, अशी मागणीही गोरखे यांनी केली. 'अनंत बद्दर समितीला सक्रिय करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा,' अशी समाजाची मागणी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी दिलीप कांबळे, रमेश बागवे, जितेश अंतापूरकर आणि मारुती वाडेकर यांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले, तसेच या निर्णयाची लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
बैठकीच्या शेवटी आमदार सुनील कांबळे यांनी मुख्यमंत्री आणि उपस्थित सर्व मंत्र्यांचे आभार मानले. या निर्णयामुळे मातंग समाजाच्या दीर्घकाळापासूनच्या आरक्षणाच्या मागणीला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
Maharashtra Reservation, Sub-categorization, Matang Community, CM Devendra Fadnavis, Government Decision
#MaharashtraReservation #MatangCommunity #DevendraFadnavis #ReservationPolicy #SubCategorization #Mumbai #SocialJustice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: