पिंपरी-चिंचवड: एअर इंडियाच्या विमानाच्या केबिन क्रूमध्ये कार्यरत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर येथील रहिवासी इरफान शेख (वय २२) याचा अहमदाबाद येथील विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल, गुरुवारी (१२ जून २०२५) एअर इंडियाकडून त्यांच्या कुटुंबियांना इरफानच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
इरफान शेख हा बकरी ईदच्या दिवशीच पिंपरी-चिंचवडमध्ये आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आला होता आणि दोन-तीन दिवस कुटुंबीयांसोबत राहून परत गेला होता. त्याचे एअरलाईन्समध्ये मोठे करियर करण्याचे स्वप्न होते आणि त्याने हे क्षेत्र स्वतःहून निवडले होते. अवघ्या दीड ते दोन वर्षांपूर्वीच त्याने नोकरीला सुरुवात केली होती.
इरफानचा मृतदेह आणण्यासाठी त्याचे आई-वडील अहमदाबादला रवाना झाले आहेत. मात्र, त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफानचा मृतदेह डीएनए चाचणीनंतरच कुटुंबाकडे सुपूर्द केला जाईल. यासाठी काल रात्री इरफानच्या मोठ्या भावाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. डीएनए चाचणीचा अहवाल येण्यासाठी ४८ ते ७२ तास लागतील, तोपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
इरफानच्या काकाने याबाबत बोलताना सांगितले की, "इरफान बकरी ईदला इथे आला होता, तेव्हा आमची भेट झाली. दोन-तीन दिवस तो सुट्टीसाठी आला होता. त्यावेळी आमची भेट झाली होती. त्याची स्वप्ने खूप मोठी होती. त्याला इतर अनेक पर्याय उपलब्ध असतानाही त्याने सांगितले होते की, मला एअरलाईन्समध्येच काम करायचे आहे आणि याच क्षेत्रात मोठे करियर करायचे आहे. काल ही दुःखद बातमी मिळाली, जी अत्यंत क्लेशदायक आहे."
Pimpri Chinchwad, Air India Accident, Irfan Shaikh, Cabin Crew, Tragic Death
#IrfanShaikh #PimpriChinchwad #AirIndiaAccident #TragicLoss #Ahmedabad #CabinCrew #SantTukaramNagar #PuneNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: