भाजप चिटणीस सचिन काळभोर यांची मेट्रो अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
पिंपरी-चिंचवड, २० जून २०२५: निगडी ते पिंपरी दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामाच्या ठिकाणी आज दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी एक गंभीर अपघात झाला. मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली, लोकमान्य टिळक रस्त्यावर, श्री विशाल ज्वेलर्ससमोर, आकुर्डी दत्तवाडी येथील शाळेची विद्यार्थिनी नंदिता तरळ हिच्या अंगावर मेट्रो प्रकल्पाच्या कंपाऊंडचा लोखंडी पत्रा पडून ती जखमी झाली. या घटनेमुळे मेट्रो रेल्वेच्या कामाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, सध्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरू असल्यामुळे निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वेचे काम तात्पुरते स्थगित करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन केली होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आज ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप काळभोर यांनी केला आहे.
या अपघातानंतर सचिन काळभोर यांनी तात्काळ मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनेची दखल घेऊन संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पालखी सोहळ्याच्या काळात वारकऱ्यांची तसेच सामान्य नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता, प्रशासनाने कामाला स्थगिती देण्याची मागणी केली असतानाही ती फेटाळल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मेट्रो अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने कठोर पावले उचलावीत, असे काळभोर यांनी म्हटले आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------- Pimpri-Chinchwad, Metro Accident, Student Injured, Nandita Taral, Sant Tukaram Palkhi, Metro Construction, Safety Lapse, Sachin Kalbhor, BJP
#PimpriChinchwad #MetroAccident #StudentSafety #PalkhiSohala #MetroConstruction #SachinKalbhor #PuneNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: