पुणे: वारजे माळवाडी परिसरात दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत, पैसे न दिल्याने टेम्पोची तोडफोड करून मारहाण करणाऱ्या आणि नंतर मालकाला व त्याच्या भाच्याला धारदार वस्तूने जखमी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना गुन्हे शाखा, युनिट ३ अंतर्गत वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी आशितोष नारायण साठे (वय २२ वर्षे, रा. कुळे, ता. मुळशी, पुणे) आणि ओम सचिन वनकुद्रे (वय १९ वर्षे, रा. तपोधाम सोसायटी, वारजे) असे आहेत.
दि. ०७/०६/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ३, अंतर्गत वारजे माळवाडी स्टेशनकडील बीट मार्शल आणि सी आर मोबाईलवरील अंमलदार हद्दीमध्ये गस्त घालत असताना, भंगार दुकानातील एक कामगार टेम्पो घेऊन त्याच्या घरी जात होता. रामनगर येथील लेन नं ५ तपोधाम परिसरातील सार्वजनिक रोडवर ६ ते ७ अज्ञात व्यक्तींनी त्याला अडवून दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. कामगाराने पैसे देण्यास नकार दिल्याने, चिडून त्यांनी त्याच्या टेम्पोची काच दगडाने फोडली, त्याला हाताने मारहाण केली आणि शर्टच्या खिशातील २०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच, त्याला शिवीगाळ केली. कामगाराने घडलेला प्रकार त्याच्या मालकाला फोनवर सांगितल्यावर मालक शाहिद, अमन आणि भाचा राहिल मणियार हे घटनास्थळी आले. मणियार यांनी त्यांना गाडीची काच का फोडली असे विचारले असता, आरोपींनी त्यांना धारदार वस्तूने हातावर मारून जखमी केले.
या भांडणाबाबत वारजे बीट मार्शल आणि सी आर मोबाईल यांना कॉल आला. त्यावेळी वारजे माळवाडी हद्दीतील सी आर मोबाईल, रामनगर मार्शल, अचानक चौक मार्शल आणि कर्वेनगर मार्शलवरील अंमलदार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी भांडणातील आशितोष साठे आणि ओम वनकुद्रे यांना पाठलाग करून पकडले. वारजे डी बी पथकाच्या मदतीने त्यांना वारजे स्टेशन अंतर्गत रामनगर चौकी येथे आणण्यात आले. या घटनेबाबत वारजे माळवाडी स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११० (२) (गुन्हेगारी कट), १११ (९), ११४ (R), ३४९ (२) (३), ३५२, ३२८ (८), आर्म्स अॅक्ट ८ (२४), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट ७, आणि महाराष्ट्र अधिनियम ३ (९) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
अपर आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त (गुन्हे-१) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ निरीक्षक विश्वजित काईगडे, वारजे माळवाडी स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रंगराव पवार, तसेच अंमलदार श्रीहरी कांबळे, रवीना जाधव, चेतन गद्रे (चालक), विष्णू जाधव, युवराज कोंढाळकर, राजू वाकळे, वैभव वैद्य, ऐश्वर्या साळी, दिपाली जाधव यांनी ही कामगिरी केली आहे.
- ---------------------------------------------------------------------------------------------------------
- Crime, Extortion, Assault, Vandalism, Arrest, Warje Malwadi, Pune, Gang Violence
- #WarjeMalwadiCrime, #Extortion, #Assault, #Vandalism, #PunePolice, #Arrest

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: