वारी दरम्यान पुणे परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी

 


पुणे: यंदाच्या आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. याचाच एक भाग म्हणून, २० जून ते २३ जून २०२५ या कालावधीत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरास मनाई करण्यात आली आहे.  सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) २०२३ च्या कलम १६३ नुसार हे आदेश जारी केले आहेत.  

पुणे शहरात दरवर्षीप्रमाणे संत श्री तुकाराम महाराज संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा साजरा होत असतो.  हा आषाढी पालखी सोहळा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, तो एक ऐतिहासिक परंपरा आहे आणि शहरात तो सर्वाधिक लोकप्रिय सोहळा बनला आहे.  या सोहळ्याला पुणे शहर, राज्यातील विविध भागातून तसेच परदेशातूनही भाविक, वारकरी आणि पर्यटक मोठ्या संख्येने येतात.  लाखो भाविकांच्या भावना या पालख्यांशी निगडीत असल्याने, पालखीच्या आगमनाच्या, मुक्कामाच्या आणि मार्गक्रमणाच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये याची दक्षता घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.  

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा गर्दीच्या ठिकाणी काही व्यक्तींकडून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.  ही बाब लक्षात घेऊन, रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर आणि कार्यकारी दंडाधिकारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरास बंदी घातली आहे.  

 या आदेशातून केवळ पुणे शहर पोलिसांकडून हवाई पाळत ठेवण्यासाठी वापरले जाणारे ड्रोन कॅमेरे किंवा पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने वापरले जाणारे ड्रोन कॅमेरे यांना अपवाद असेल.  या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------Ashadhi Palkhi, Pune Police, Drone Ban, Law and Order, Public Safety, Warkari, Sant Tukaram Palkhi, Sant Dnyaneshwar Palkhi

 #AshadhiPalkhi #PunePolice #DroneBan #PalkhiSohala #PuneNews #LawAndOrder #PublicSafety #Maharashtra

 


वारी दरम्यान पुणे परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी वारी दरम्यान पुणे परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी Reviewed by ANN news network on ६/१७/२०२५ ०९:१५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".