पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासप्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन

 


पिंपरी, १७ जून २०२५: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुणे-आळंदी पालखी मार्गावर वडमुखवाडी येथे उभारण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समूहशिल्प व संतसृष्टीचे लोकार्पण, संतपीठातील प्रेक्षागृह व कलादालनाचे लोकार्पण यासह विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन बुधवार, १८ जून २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी ही माहिती दिली.

केंद्रीय व राज्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती असेल. याव्यतिरिक्त खासदार, आमदार आणि अनेक मान्यवर व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नवीन पिढीसाठी ‘संतसृष्टी’चे लोकार्पण; २५ शिल्पे आणि ४७ ब्रॉन्झ म्युरल्स

थोरल्या पादुका, वडमुखवाडी, चऱ्होली येथे सकाळी १०.३० वाजता संतसृष्टीचा लोकार्पण कार्यक्रम होईल. नवीन पिढीला वारकरी संप्रदाय आणि संतांची माहिती मिळावी या उद्देशाने 'संतसृष्टी' साकारण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीचे स्मरण म्हणून ही निर्मिती केली आहे. यात मिश्र धातूपासून तयार केलेली २५ शिल्पे (ज्यामध्ये संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत सोपान, संत निवृत्ती, संत मुक्ताबाई आणि २० वारकरी) आहेत. यासोबतच ४७ ब्रॉन्झ म्युरल्स आणि माहिती फलक उभारले आहेत, ज्यात संतांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग दर्शवले आहेत.

चिखली येथील 'संतपीठ'मध्ये अत्याधुनिक सुविधा; १.५० लाख वृक्ष लागवडीचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चिखली येथील ‘संतपीठ’ला प्रत्यक्ष भेट देणार असून, येथे उभारण्यात आलेल्या प्रेक्षागृह व कलादालनाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. तळमजला आणि ५ मजले असलेल्या या संतपीठाचे एकूण बांधकाम क्षेत्र १३१६१.७१ चौरस मीटर आहे. यात ४ उद्वाहक, दिव्यांग मुलांसाठी रॅम्प, ५५ वर्गखोल्या, ९ कार्यालये, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, सभागृह, संगीत कक्ष, स्वच्छतागृहे आणि विस्तीर्ण क्रीडांगण अशा सुविधा आहेत. या संतपीठातच १ लाख ५० हजार देशी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात येणार आहे.

टाऊन हॉल चिखली येथे विविध विकासकामांचे ऑनलाइन भूमिपूजन व लोकार्पण

संतपीठातील कार्यक्रमांनंतर चिखली टाऊन हॉल येथे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विकसित ज्येष्ठ नागरिकांकरिता 'ज्येष्ठानुबंध ॲप' आणि वाहतूक नियमनाकरिता 'ट्रॅफिक बडी व्हॉट्सॲप प्रणाली'चे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होईल. याशिवाय, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पणही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यामध्ये प्रभाग क्र. १६ मधील मुकाई चौक कृष्णा हॉटेल ते लोढा स्किमपर्यंतचा एक्सप्रेस हायवे लगतचा १२ मीटर डी.पी. सर्विस रस्ता विकसित करणे, बापदेव मंदिर येथील किवळे गावातील मुख्य रस्ता ते एक्सप्रेस हायवेपर्यंतचा सिंबायोसिस कॉलेजमागील १८ मीटर डी.पी. रस्ता विकसित करणे, विकासनगर येथील मुख्य रस्ता डांबरीकरण करून विकसित करणे, गवळी माथा ते इंद्रायणीनगर चौक पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट स्केपिंग पद्धतीने विकसित करणे, पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग नागरिकांचे सर्वेक्षण आणि मॅपिंगचा शुभारंभ, संत मदर टेरेसा उड्डाणपूलावरील लूप/रॅम्पचे लोकार्पण, पवना नदीवरील थेरगाव-चिंचवड पुलाचे लोकार्पण, अमृत योजनेअंतर्गत चिखली (१२ एमएलडी) व पिंपळे निलख (१५ एमएलडी) क्षमतेच्या मैलाशुद्धीकरण प्रकल्पांचे लोकार्पण, पिंपळे सौदागर येथील क्लायबिंग वॉलचे लोकार्पण, दिघी, चऱ्होली आणि भोसरी येथील नवीन शाळा इमारतींचे लोकार्पण, तसेच थेरगाव व भोसरी रुग्णालयातील मध्यवर्ती निर्जंतुकीकरण विभागाचे लोकार्पण, आणि सखुबाई गबाजी गवळी उद्यान येथील बहुमजली वाहनतळ इमारतीचे उद्घाटन यांचा समावेश आहे.


  • Pimpri-Chinchwad, Devendra Fadnavis, SantSrushti, Santpeeth, Groundbreaking Ceremony, Inauguration, Development Projects, Tree Plantation, Municipal Corporation, Maharashtra, Public Works, Digital Initiatives.
  • #PimpriChinchwad #DevendraFadnavis #SantSrushti #Santpeeth #DevelopmentProjects #MaharashtraCM #CivicDevelopment #SmartCity #TreePlantation #Inauguration
पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासप्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासप्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन Reviewed by ANN news network on ६/१७/२०२५ ०९:०२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".