पुणे: पुणे शहरात अवैध धंदे आणि वाहतुकीवर परिणामकारक कारवाई करण्याच्या आदेशांनुसार, काळेपडळ पोलिसांनी कंजारभाट वस्ती, संतोषनगर येथील एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीजवळच्या अवैध गावठी हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत ४ लाख १३ हजार रुपयांची तयार हातभट्टी दारू जप्त करण्यात आली असून, दारू विक्री करणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी नवीन दिलीप बिनावत (वय ५४ वर्षे, रा. सातवनगर, हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
अपर आयुक्त, पुणे शहर यांच्या आदेशानुसार, काळेपडळ स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांनी तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना अवैध धंदे आणि वाहतुकीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेप्रमाणे, दि. ११/०६/२०२५ रोजी काळेपडळ स्टेशनकडील तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक अमित शेटे आणि अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संतोषनगर, हांडेवाडी रोड, सातवनगर, पुणे येथील बांधकाम चालू असलेल्या बिल्डिंगजवळ एक इसम दारूचा साठा करून लोकांना दारू विकत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली.
या छापा कारवाईमध्ये दारू विक्री करणारा नवीन दिलीप बिनावत यास ताब्यात घेण्यात आले. सदर ठिकाणावरून तयार हातभट्टीच्या दारूने भरलेले एकूण ५३ कॅन आणि एका बॅरलमध्ये भरून ठेवलेली २०६५ लिटर तयार ४,१३,०००/- रुपये किमतीची हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे.
याबाबत काळेपडळ स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर २२५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३ (प्रतिबंधित वस्तू बाळगणे) प्रमाणे सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) (अवैध दारू निर्मिती व विक्री) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी उप आयुक्त (परिमंडळ-५) डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (वानवडी विभाग) धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील, निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक निरीक्षक अमित शेटे, अंमलदार दाऊद सय्यद, अतुल पंधरकर, खोकले, महादेव शिंदे, अमोल फडतरे, शाहीद शेख, नितीन ढोले, प्रवीण कांबळे, परशुराम पिसे यांच्या पथकाने केली आहे.
- -------------------------------------------------------------------------------------------------------------
- Illegal Liquor, Distillery, Seizure, Arrest, Kale Padal, Pune, Crime
- #IllegalLiquor, #KalePadalCrime, #PunePolice, #AlcoholSeizure, #Arrest

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: