अधिकाऱ्यांना सूचना; अवैध धंद्यांवर कारवाई आणि विकासकामांना गती देण्याचे निर्देश
मावळ : पावसाळ्यात लोणावळा, कार्ला, आंदर, पवन आणि नाणे मावळात मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना सर्व सुविधा मिळाव्यात आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, अशा सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. वडगाव येथील पंचायत समिती कार्यालयात पार पडलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
पर्यटक सुविधा आणि वाहतूक व्यवस्थापन:
खासदार बारणे यांनी पार्किंगच्या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी मुरुम टाकून दुरुस्ती करण्याची सूचना केली. तसेच, पोलिसांनी केवळ धाक न दाखवता पर्यटकांना सुविधा द्याव्यात आणि चुकीचे कृत्य करणाऱ्या पर्यटकांवरच कारवाई करावी, असे निर्देश दिले. अतिउत्साही पर्यटक धबधब्याखाली पाण्यात उतरतात, अशा ठिकाणी कर्मचारी वाढवून दुर्घटना टाळण्याची दक्षता घेण्यास सांगितले. पावसाळ्यात वाहतूक कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेण्यावरही त्यांनी भर दिला.
उपस्थित मान्यवर आणि अधिकारी:
या बैठकीला प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, मावळ तहसीलदार विक्रम देशमुख, गट विकास अधिकारी कुलदीप प्रधान, वडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रवीण निकम, तळेगावचे मुख्याधिकारी विजय सरनाईक, लोणावळा नगरपरिषदचे मुख्याधिकारी अशोक साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय पाटील, क्षीरसागर उप, धनराज दराडे, कविता पाटील, पोलीस निरीक्षक प्रभापती पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजया म्हेत्रे, कृषी अधिकारी मारुती साळे, माजी सभापती गुलाब म्हाळस्कर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, शिवसेना तालुका प्रमुख राजाभाऊ खांडभोर, शिवसेना उप तालुका प्रमुख राम सावंत, अमित कुंभार, धनंजय नवघने, देहूगाव शिवसेना शहर प्रमुख सुनील हगवणे, युवासेना उप जिल्हा प्रमुख दत्ता केदारी, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, युवासेना तालुका प्रमुख राजेश वाघोले, माजी नगरसेविका कल्पना आखाडे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, मनीषा भांगरे, नितीन कुडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, महसूल, कृषी, पाणीपुरवठा या सर्व विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासकामांना गती देण्याचे निर्देश:
खासदार बारणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला चालू असलेली रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि रस्त्यावरील खड्डे बुजवून पावसाळ्यात खड्डे पडणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. आई एकवीरा देवीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन कामाचा दर्जा राखण्याची आणि त्याला गती देण्याची सूचना त्यांनी केली. कार्ला ते मळवली आणि भाजे लेणी ते लोहगड, विसापूर किल्ल्याकडे जाणारे अर्धवट रस्ते तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हा परिषदे अंतर्गत सुरू असलेली रस्त्यांची कामेही त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले. जलजीवन मिशनअंतर्गत मावळ मतदारसंघात सुरू असलेल्या कामांमध्ये त्रुटी असल्याने ती सुधारून दर्जेदार कामे करण्याची आणि वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकून पैशांची वसुली करावी, असेही त्यांनी सांगितले.
अवैध धंद्यांवर कारवाई आणि आरोग्य जनजागृती:
मावळातील अवैध धंदे, विशेषतः धाब्यावर होणारी अवैध मद्य विक्री, एमडी ड्रग्सची विक्री आणि शाळांजवळ होणारी गुटखा विक्री तातडीने बंद करण्याची मागणी त्यांनी केली. साथीचे आजार वाढू नयेत यासाठी औषध फवारणी करावी आणि पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी आरोग्य विभागाने जनजागृती करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. महावितरणला पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी करून घेण्यास आणि डीपीची मागणी असलेल्या ठिकाणी डीपी बसवण्यास सांगितले. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. तसेच, जनजागृती करून सूर्यघर आणि कुसुम योजना लोकांपर्यंत पोहोचवावी, बियाणे व खतांची चढ्या दराने विक्री होणार नाही याची काळजी घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना खासदार बारणे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
Maval, Lonavala, Shrirang Barne, MP, Tourism, Infrastructure, Road Works, Illegal Activities, Monsoon Preparedness, Public Facilities, Maval Assembly Constituency, Maharashtra.
#Maval #ShrirangBarne #Tourism #Infrastructure #MonsoonPreparedness #PublicFacilities #RoadWorks #IllegalActivities #Lonavala #MaharashtraPolitics

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: