भोसरी एमआयडीसी: भोसरी एमआयडीसी येथे एका कंपनीच्या संचालकांनी ६.५ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २००० ते २०१० दरम्यान झेविऑन इलेक्ट्रिक मोबिलिटी, प्रा. लि. पत्ता: गट नं.-१५८३, देहू मोशी रोड, विठ्ठलनगर, पुणे येथील संचालक अविनाश बेलगमवार आणि आकाश बेलगमवार यांनी वाहनाचे मॉडेल विकसित करून स्वतंत्र उत्पादनातून गाडीची निर्मिती केली. परंतु, गाडी विक्री न झाल्यामुळे त्यांनी कंपनीचे भागभांडवल व स्थावर मालमत्ता जनसेवा बँक, हडपसर, पुणे येथे गहाण ठेवली.
कर्ज परतफेड न झाल्यामुळे बँकेने वसुली प्रक्रिया सुरू केली आणि गहाण मालमत्ता लिलावात काढली. त्यावेळी आरोपी बेलगमवार यांनी ज्योती सोल्यूशनवर्क्सचे संचालक नित्यानंद थेवर यांना बँकेशी कर्जाची तडजोड करून सर्व मालमत्ता विकत घेण्यास सांगितले. या बदल्यात, नवीन स्थापन करण्यात येणाऱ्या 'झेविऑन मोबिलिटी इलेक्ट्रिक प्रा. लि.' या कंपनीत ज्योती सोल्यूशनवर्क्सला ५० टक्क्यांहून अधिक भागीदार बनवण्याचे आश्वासन दिले. गुंतवणुकीचे प्रस्ताव ई-मेलद्वारे पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला.
ज्योती सोल्यूशनवर्क्सने बँकेकडून मालमत्ता विकत घेतल्यानंतर आणि त्या मालमत्तेचे विक्रीचे सर्व अधिकार प्राप्त झाल्यानंतर, आरोपींनी सदर कंपनीसोबत काम करण्यास नकार दिला. नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या कंपनीमध्ये सहभागी करून न घेता, ज्योती सोल्यूशनवर्क्सने बँकेकडून विकत घेतलेली मालमत्ता व आयपी अधिकार पुन्हा खरेदी करण्याचे आश्वासन व हमीपत्र लिहून दिले. काही रकमेच्या मोबदल्यात ज्योती सोल्यूशनवर्क्स कंपनीकडून गाडी निर्मितीसाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे डाय विकत घेऊन आरोपी अविनाश व आकाश बेलगमवार यांनी संगनमत करून ज्योती सोल्यूशनवर्क्सचे डाय व आयपी वापरून, त्यांच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या आयपी अधिकारांचा गैरवापर करत गाडीचे उत्पादन केले आणि ६.५ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक दाभाडे पुढील तपास करत आहेत.
- -------------------------------------------------------------------------------------------------------- #FinancialFraud, #CorporateCrime, #BhosariMIDC, #PuneCrime

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: