पुणे, दि. १४ जून २०२५: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पवार यांच्या उपस्थितीत १७ जून रोजी पिंपरी-चिंचवड शहरात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत पक्षप्रमुख शरद पवार मार्गदर्शन करणार असून, पिंपरी-चिंचवडमधील पक्षाची सद्यस्थिती आणि आगामी रणनीतीवर चर्चा होणार आहे. शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
'मिशन पीसीएमसी'ची तयारी:
महानगरपालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना, 'मिशन पीसीएमसी' अंतर्गत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून, संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. राज्यभरातील बदललेले राजकीय समीकरण आणि कार्यकर्त्यांच्या बदललेल्या निष्ठेच्या पार्श्वभूमीवर मैदानात उतरण्यासाठी नवीन रणनीती ठरवली जाईल.
बैठकीमध्ये विधानसभा निहाय स्थिती, तसेच संघटन, संभाव्य उमेदवार, प्रचार यंत्रणा आणि सोशल मीडिया आघाडीवर सखोल चर्चा अपेक्षित आहे. बैठकीला सर्व प्रमुख पदाधिकारी, शहराध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष आणि इतर निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या बैठकीतून पक्षाची एकजूट दाखवणे हाही एक महत्त्वाचा उद्देश असल्याचे समजते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: