पिंपरी चिंचवड - हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासारसाई येथे जमिनीच्या वादावरून एकाच दिवशी दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. एकीकडे वकील संदीप भोईर यांच्यावर बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप तर दुसरीकडे शब्बीर मुलाणी यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप
दि. ६ जून २०२५ रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास कासारसाई येथील सर्व्हे नं. १९/१ मुलाणी वस्तीत ही घटना घडली. फिर्यादी शब्बीर करीमभाई मुलाणी (वय ६३, शेतकरी) यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते घराबाहेर बसले असताना वकील संदीप भोईर आणि त्यांच्यासोबतचे तीन-चार अनोळखी व्यक्ती त्यांच्या मिळकतीत प्लॉट पाहत होते.
जेव्हा मुलाणी यांनी ही जागा आपली असल्याचे सांगून त्यांना विचारले, तेव्हा वकील भोईर यांनी संतप्त होऊन बंदूक दाखवली. त्यांनी मुलाणी आणि त्यांच्या मुलीला धमकी दिली तसेच त्यांच्यासोबतच्या व्यक्तींनी शिवीगाळ आणि दमदाटी केली.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८१/२०२५ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १८९(४), १९१(२), १९०, ३५१(३) तसेच आर्म्स ॲक्ट कलम ३(३०) आणि महाराष्ट्र अधिनियम कलम ३७(१)(३), १३५ अन्वये आरोप ठेवण्यात आले आहेत.
न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याचा आरोप
त्याच दिवशी त्याच वेळी वकील संदीप हिरामण भोईर (वय ४८, रा. डांगे चौक, थेरगाव) यांनी शब्बीर मुलाणी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयाचे 'जैसेथे' परिस्थिती ठेवण्याचा आदेश असताना, मुलाणी आणि चार-पाच अनोळखी व्यक्तींनी बेकायदेशीर जमाव करून कासारसाई येथील १६ एकर जमिनीचे कंपाऊंड तोडले.
भोईर यांच्या तक्रारीनुसार, आरोपींनी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करत असताना त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलाणी गटाने लाकडी दांडे आणि कुऱ्हाड घेऊन त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दगडफेक केली आणि धमक्या दिल्या.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक २८२/२०२५ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १२५, ३२९(३), ३५२, ३५१(२), ३२४(४), १८९(२), १८९(४), ५०४, ५०६ आणि महाराष्ट्र अधिनियम ३७(१)(३), १३५ अन्वये आरोप ठेवण्यात आले आहेत.
दोन्ही प्रकरणांचा तपास सहाय्यक उपनिरीक्षक पांचाळ करत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------Land Dispute, Legal Conflict, Court Order Violation, Weapon Threat, Property Rights
#LandDispute #HinjwadiNews #PropertyConflict #CourtOrderViolation #PimpriChinchwad #LegalNews #PuneRural #JusticeSystem #WeaponThreat #LandRights

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: