पुणे: लोणीकाळभोर पोलिसांनी चोरीस गेलेल्या ४९५ किलो वजनाच्या आणि ३ लाख १ हजार ९५०/- रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा जप्त करत तीन आरोपींना अटक केली आहे. अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल असतानाही, पोलिसांनी यशस्वीपणे तपास करून आरोपींना जेरबंद केले.
या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी सुरज शाम जाधव (वय १९ वर्षे, रा. चव्हाण वस्ती, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे), यश अजित सावंत (वय २१ वर्षे, रा. चव्हाणवस्ती, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) आणि महेश बस्वराज पुजारी (वय २२ वर्षे, रा. थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) असे आहेत.
दि. ०६/०६/२०२५ रोजी फिर्यादींनी त्यांचा टेम्पो जय मल्हार हॉटेलसमोरील रोडच्या बाजूला, मौजे थेऊर, ता. हवेली, जि. पुणे येथे मोकळ्या जागेत लावला होता. या टेम्पोमध्ये जुन्या जळलेल्या तांब्याच्या तारांचे ५५ बंडल भरलेली पोती होती. दि. ०७/०६/२०२५ रोजी सकाळी ०६:३० वाजता फिर्यादी टेम्पोजवळ आले असता, त्यांना टेम्पोमधील तांब्याच्या तारांची ९ पोती (एकूण ४९५ किलो वजनाच्या आणि ३,०१,९५०/- रुपये किमतीच्या) कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसले. याबाबत त्यांनी लोणीकाळभोर स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती आणि अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २५०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर, लोणीकाळभोर स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस स्टेशन स्तरावर दोन स्वतंत्र पथके तयार करून त्यांना आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार तपास पथकात नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार प्रदीप गाडे व राहुल कर्डीले यांना आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी आरोपींचा शोध घेऊन लोणीकाळभोर स्टेशनकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने सापळा रचून दि. १०/०६/२०२५ रोजी आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केल्यानंतर, लोणीकाळभोर पोलिसांनी त्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या ४९५ किलो वजनाच्या व ३,०१,९५०/- रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कामगिरी उप आयुक्त (परिमंडळ-०५) डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक आयुक्त (हडपसर विभाग) श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, उपनिरीक्षक अनिल जाधव, अंमलदार जाधव, सातपुते, वणवे, भोसले, माने, जगदाळे, देवीकर, बारगजे, माने, गाडे, कर्डीले, सोनवणे, शिरगिरे, दडस, पाटील, कुदळे, विर आणि महिला अंमलदार थोरात यांनी केली.
- ----------------------------------------------------------------------------------------------------------------Crime, Theft, Copper Theft, Arrest, Loni Kalbhor, Pune, Metal Theft
- #CopperTheft, #LoniKalbhorCrime, #Theft, #PunePolice, #Arrest

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: